बीड : तालुक्यातील बाभूळवाडी- बेलवाडी गावातील राजकीय वातावरण तापले आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या शुल्लक वादातून दोन गटांत तुंबळ वाद झाला असून, गावातील वादाप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात, तर बीड येथे झालेल्या प्रकारावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील दोन्ही गटांतील आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अंकुश कचरू सातपुते (रा. बाभूळवाड) यांच्या फिर्यादीनुसार गणेश सातपुते यांच्या हॉटेलवर गुरुवारी रात्री ८ वाजता दगडफेक करण्यात आली. ही माहिती कळल्यानंतर अंकुश सातपुते दुचाकीवरून हॉटेलकडे जात होते. यावेळी दादासाहेब खिंडकर, समाधान खिंडकर, ज्योतीराम भटे, कुंडलिक भटे, महादेव मातकर, शहादेव मातकर, मोतीराम मातकर, लक्ष्मण सातपुते, बाबू मातकर, चव्हाण, अमोल ढेपाळे (सर्व रा. बेलवाडी) व शंकर कदम (ईट, ता. बीड) हे जवळ आले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच गळ्याला तलवार लावून १० हजार रुपये काढून घेतले व दुचाकीवर दगडफेक करून नुकसान केले.
तर महादेव मातकर यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे परमेश्वर सातपुते, अंकुश सातपुते, हनुमान सातपुते, अशोक सातपुते, केशव निर्धार, राम शिंदे, उत्तरेश्वर भटे, गोरख भटे, कृष्णा सातपुते, अंबादास सातुपते, लहू भटे, महादेव शिंदे, कचरू सातपुते, सखाराम भटे, आसाराम भटे, (सर्व रा. बाभूळवाडी, ता. बीड) जालिंदर भटे, राजेंद्र सातपुते (दोघे रा. बेडकुचीवाडी) यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न व दरोड्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि. शरद भुतेकर यांनी याप्रकरणी घटनास्थळी पाहणी केली असून, तपास सुरू असल्याचे सांगितले.
शिवाजीगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेलवाडी, बाभूळवाडी, बेडकुचीवाडी या ग्रुप ग्रामंपचायतीच्या सरपंच अश्विनी खिंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परमेश्वर सातपुते याने २९ जानेवारी रोजी डोक्याला पिस्टल लावले व मिनी गंठन हिसकावून घेतले, तसेच रोख रक्कम चोरून नेली असा गुन्हा दाखल कले आहे. तर, परमेश्वर सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या घरावर २८ रोजी उशिरा १३ जणांनी सशस्त्र हल्ला हल्ला करून १ लाख रोख व २ तोळे सोने लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही प्रकरणांत शिवाजीनगर व पिंपळनेर पोलीस तपास करत असून, आरोपी अजूनदेखील फरार आहेत.