परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दादाहरी वडगाव व दाऊतपूर शिवारातील तळ्यातील राख व राखसाठ्याच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून प्रदूषण हटाव आणि दादाहरी वडगाव बचाव या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव,दाऊतपूर शिवारात थर्मलचे राख तळे असून या तळ्यातून दररोज ४ हजार टिप्पर भरून राखेची वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक परळी- गंगाखेड रस्त्यावर दुचाकीसह सर्वच वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. विशेष म्हणजे दादाहरी वडगाव येथील साडेतीन हजार ग्रामस्थांना राखेच्या प्रदूषणाचा अनेक वर्षांपासून त्रास होत आहे. ग्रामस्थांना डोळ्यांचे व फुफ्फुसाचे आजार होत आहेत. गेल्या पाच वर्षात श्वसनाचे गंभीर आजार जडलेले रुग्ण वाढले आहेत.
परळी विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्याकडून कसलीही ठोस कारवाई केली जात नसल्याने राखेची परळी व परिसरातून वाहतूक सुरूच आहे. राख तळ्यातून होणारी राखेची वाहतूक बंद करावी व दा. वडगाव, दाऊतपूर शिवारात राखेचे साठे नष्ट करावेत आणि प्रदूषणमुक्त गाव करावे या मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी परळी -गंगाखेड रस्त्यावरील दादाहरी वडगावजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी ग्रामस्थांनी नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.
दादाहरी वडगाव चे ग्रामस्थ राखेच्या प्रदूषणामुळे त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांना प्रदूषणाचा त्रास होत आहे. आरोग्यावर परिणाम होतोय, परंतु या भागातील लोकप्रतिनिधी व औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
-शिवाजी शिंदे ,माजी सरपंच दादाराव वडगाव.
औष्णिक विद्युत केंद्राच्या राख प्रदूषणामुळे व सिमेंट कंपनीमुळे परळी शहर व परिसरातील नागरिकांच्या शरीरावर तर परिणाम होतच आहे.शिवाय मुखरोग, छातीचे विकार होत आहेत. तसेच महिलांना ही प्रदूषणाचा त्रास होत आहे. या प्रश्नी राख प्रदूषण नियंत्रण समितीने सुरू केलेल्या चळवळीत प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे
- डॉ.मनोज मुंडे दंत चिकित्सक
परळी तालुक्यातील दाऊतपूर,वडगाव येथून वाहतूक होणाऱ्या राखेच्या वाहनांवर तीन दिवसांपासून कारवाई करण्यात येत आहे.ज्या ठिकाणी राख साठे असतील ते राखेचे साठे उद्ध्वस्त करून संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात येतील.
-शिवलाल पूरभे, परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक.
राखेच्या प्रदूषणासंदर्भात परळी विद्युत केंद्र व ग्रामीण पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. -
बाबुराव रुपनर -नायब तहसीलदार परळी