बीड : मोक्का गुन्ह्यातील आरोपी व वाल्मिक कराडचा साथीदार ज्ञानबा मारुती गित्ते ऊर्फ गोट्या गित्तेचा रेल्वे ट्रॅकवर बसलेला एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाला. वाल्मिक कराड दैवत, धनंजय मुंडे यांना टार्गेट करू नका, असे तो व्हिडीओ क्लिपमध्ये म्हणत असल्याचे दिसून येत आहे; परंतु हा व्हिडीओ जुना असल्याचा अंदाज आहे.
व्हिडीओमध्ये गोट्या गित्ते म्हणतो की, मी कराड यांचा कार्यकर्ता आहे. माझ्यावर विनाकारण दरोडे, चोरी, खंडणी यांसारखे गुन्हे असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, हे गुन्हे माझ्यावर दाखल आहेत का, याची पडताळणी करा, विनाकारण आरोप करू नका. बबन गित्तेने माझ्यासमोर माझा मित्र सरपंच बापू आंधळे याला गोळ्या घातल्या. त्यावर काहीच बोलत नाहीत. जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे की अध्यक्ष आहे, हे माहीत नाही; परंतु बबन गित्ते तुमच्यासोबत होता, पक्षात होता, त्याने (सरपंच आंधळे) त्याच्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या, त्यावेळी तुम्ही उठाव का केला नाही, असा सवाल गित्ते याने व्हिडीओमध्ये उपस्थित केला.
जितेंद्र आव्हाडांना केले लक्ष्य संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी मिळालीच पाहिजे, वाल्मिक कराडच्या मागे उगाचच लागलात, तुम्हाला राजकारण करायचे आहे.
जितेंद्र आव्हाड, तुझे माझ्याकडे व्हाइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत. ‘तुम बडे भाई... सॉरी सॉरी...’ असे तुम्ही म्हणालात, यासह इतर मुद्दे गोट्या गित्ते याने उपस्थित केले आहेत.
...तरी तो पोलिसांना सापडेना गोट्या गित्ते हा मोक्कामध्ये फरार आहे. असे असताना सोशल मीडियावर तो सक्रिय असल्याचे दिसतो. बीड पोलिसांचे एक पथक चार दिवसांपासून पुणे, मुंबई, आदी ठिकाणी त्याचा शोध घेत आहे.