बीड : आजच्या आधुनिक काळात तरुण युवकांनी आपल्याकडे असलेल्या शेतीत पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे आवश्यक असल्याचे मत प्रगतिशील शेतकरी कल्याणराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते वडवणी तालुक्यातील खळवट लिमगांव येथील जागतिक कृषी महोत्सव कृषी शास्त्र विभाग श्री स्वामी समर्थ आयोजित कृषी महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, महादेव अंबुरे, अनिल वाघमारे, आण्णासाहेब जगताप, दत्तात्रय चव्हाण, प्रल्हाद गवारे यांची उपस्थिती होती.
यावेळी कुलकर्णी म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्र म्हटल की, हा भाग सुजलाम् सुफलाम् असे वर्णन आपण करतो आणि त्या भागातील सर्वच शेतकऱ्यांना आपण प्रगतिशील शेतकरी म्हणून उपमा देतो. कारण या भागातील शेतकरी आज हा शेतीकडे उद्योग म्हणून पाहतो आहे. आपल्या भागात मात्र हे चित्र दिसून येत नाही. शेतकरी हे पारंपरिक पद्धतीचा अवलंब करीत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनाही फळबागांना प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील शेतकरी आपल्या शेतीची काळजी घेत नाहीत. आपल्या शेतीची सर्व जबाबदारी कुटुंबावर सोपवितो. महिलांना कामे सांगितले जाते. स्वतःदेखील आपल्या शेताची चांगली काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगून ज्येष्ठ शेतकऱ्यांऐवजी आता युवकांनी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि एक यशस्वी शेती उद्योजक बनावे, असे मतही शेवटी प्रगतिशील शेतकरी कल्याणराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यावेळी एस. एम. देशमुख, महादेव अंबुरे आणि शेतीविषयक तज्ज्ञांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण देशमुख, शाहूराव काजवे, गणेश टकले, बाळासाहेब अंबुरे, सखाराम कणेरकर, राहुल अंबुरे, नचिकेत जाधव, ओम जाधव, दत्ता जाधव, शंकर झाडे, नारायण जाधव यांच्यासह वडवणी आणि खळवट लिंबगाव पंचक्रोशीतील शेतकरी, सेवेकरी परिवार व महिला यांनी परिश्रम घेतले.