कचऱ्याचे ढिगारे पडून
माजलगाव : शहरातील नवीन बसस्थानकसभोवती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. दुर्गंधीचा त्रास येथील नागरिकांना करावा लागतो. परिणामी डासांचे प्रमाण वाढत आहे. स्वच्छतेची मागणी जोर धरू लागली आहे. आरोग्य धोक्यात आले आहे.
तारा दुरुस्तीची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यातील घाटनांदूर परिसरातील धर्मापुरी, उजनी, पूस, आदी ग्रामीण भागात विद्युत खांब वाकले आहेत. तसेच अनेक ठिकाणी तारा सैल किंवा लोंबकळत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
बेलगाव, काळेगाव परिसरात वाळू चोरी
बीड : केज तालुक्यातील बेलगाव, काळेगाव परिसरातील नदीपात्रातील गावामध्ये व गावाबाहेर वाळू साठे करून वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. या वाळूमाफियांवर कार्यवाही न करता महसूल, पोलीस प्रशासन गप्प दिसत आहे. वाळूचे अवैध उत्खनन जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने करून चढ्या भावाने वाळू विक्री केली जात आहे.
सर्वसामान्यांची लूट
अंबाजोगाई : तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे. सामान्य ग्राहक बँकेतील अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
दीड किमी रस्त्यावर जागोजागी खड्डे
गेवराई : शिरसदेवी फाट्यापासून ते गावात जाणारा रस्ता दीड किलोमीटरचा आहे. सदरील रस्ता अत्यंत खराब झाला असून, जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. दुरुस्तीची मागणी या परिसरातील गावकऱ्यांमधून केली जात आहे. परंतु, अद्यापही याकडे लक्ष दिले जात नसल्याने गावकरी त्रस्त आहेत.
पार्किंग कोलमडली
वडवणी : शहरातील प्रमुख मार्गावरील पार्किंग व्यवस्था कोलमडली असल्याने कोंडी होत आहे. या कोंडीमुळे अनेकवेळा वाहनधारकांना पंधरा-पंधरा मिनिट कोंडीत अडकून पडावे लागत आहे. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्किंगला शिस्त लावण्याची मागणी होत आहे.