अंबाजोगाई : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम- २०१८ मधील त्रुटीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करूनही अंबाजोगाई तालुक्यातील १ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पीक विमा जमा झाला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
खरीप हंगाम- २०१८ मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा मोठ्या प्रमाणात भरला होता. परंतु, अनेकवेळा यामध्ये अडचणी आल्या. वारंवार त्रुटी निघाल्या. विमा कंपनीने १ हजार ९०९ शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विम्याची कागदपत्रे, त्रुटीमध्ये काढून त्याची पूर्तता करण्यासाठी कागदपत्रे मागितली होती. शेतकऱ्यांनी पेरणीचे काम बाजूला सारून जुलैमध्ये पीकविम्याच्या कागदपत्रांची पूर्तता केली होती. या त्रुटीमध्ये सातबारा, ८ अ चा उतारा तसेच फेरफार अनिवार्य केला होता. वारंवार कंपनी फक्त कागदपत्रांची पूर्तता करून घेते. परंतु, शेतकऱ्यांच्या खात्यावर छदमाही जमा करीत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रखडलेला पीक विमा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, कंपनीचे अधिकारी तपकिरे यांनी फोन उचलला नसल्याने याबाबत त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
पाठपुरावा सुरू आहे
शेतकऱ्यांनी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून कंपनीकडे सर्व प्रस्ताव पाठविले आहेत. याबाबत कंपनीकडे संपर्क केला असता विमा लवकरच मिळेल असे सांगतात.
- गणेश ठाकूर, तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई.