बीड : शहरात प्रेम प्रकरणातून एका होमगार्ड महिलेचा खून झाला होता. या प्रकरणात माय-लेकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिस ठाण्यात पत्नीच्या भावाचा खून करणाऱ्या मेहुण्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दोन्हीही गुन्ह्यांत सर्व आरोपी अटक आहेत.
२० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १० वाजता आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण हा हातात कोयता घेऊन जात होता. त्याला पाहिल्यावर मयत भीमराव राठोड यांचे वडील शिवाजी राठोड यांनी त्याला हटकले असता, त्याने त्यांना शिवीगाळ केली आणि निघून गेला. त्यानंतर रात्री १०:३० वाजता आरोपीने भीमराव राठोड यांना पाठीमागून गाठले. धारदार कोयत्याने त्याने भीमराव यांच्या डोक्यावर 'सपासप' अनेक वेळा वार केले. भीमराव यांचा आवाज ऐकून त्यांची पत्नी वनिता, सासू आणि सासरे घटनास्थळी धावत आले. त्यांना पाहताच आरोपीने खाली पडलेल्या भीमराव यांच्यावर पुन्हा कोयत्याने वार केले आणि तिथून पळून गेला. या प्रकरणी वनिता राठोड यांच्या फिर्यादीवरून हा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अनिल याला दारूचे व्यसन असून, तो पत्नीला मारहाण करत होता. तिला माहेरी आणल्याचा राग धरूनच अनिलने पत्नीचा भाऊ भीमराव यांचा खून केल्याचे उघड झाले.
अनैतिक संबंधात अडथळा, मैत्रीण होमगार्डला संपवलेबीड शहरातील अयोध्या राहुल व्हरकटे (वय २७) ही होमगार्ड होती. सोबतच ती बीड शहरात राहून पोलिस भरतीची तयारी करत होती. तिची मैत्रीण वृंदावणी सतीश फरतारे हिचे एका पुरुषोसाबत अनैतिक संबंध होते. त्यात अयोध्या अडथळा ठरत असल्यानेच वृंदावणीने आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अयोध्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.