परळी : तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गोदामातून 37 लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी आणखी दोन आरोपींना शुक्रवारी अटक केली आहे . या आरोपीमध्ये चोरांच्या टोळीतील एका वाहन चालकाचा व गॅस कटर चालकाचा समावेश आहे. आता याप्रकरणी एकूण अटक आरोपींची संख्या सात झाली आहे. यापूर्वी पाच जणांना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे
माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या गोदामातील 37 लाख रुपये किमतीचे विविध साहित्य चोरून नेल्याची घटना ऑक्टोबरमध्ये घडली. याप्रकरणी 22 डिसेंबर रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कारखान्याच्या लिपिकाने फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून चोवीस तासाच्या आत पाच आरोपींना अटक केली. यानंतर पोलिसांनी आणखी दोन आरोपींना शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. कारखान्यात साहित्य चोरी करणारी ही एक टोळीच असल्याचे पुढे येत आहे. या टोळीचा म्होरक्या मात्र अद्याप फरार आहे.