बीड : एचआयव्हीसारखा आजार असल्याने नातेवाईकांनी लहानपणीच दुर केलेली मुले इन्फंटच्या संस्थेत लहानाची मोठी झाली. येथे एकमेकांशी मने जुळली. मंगळवारी अशाच एचआयवही बाधित दोन जोडप्यांचा विवाह थाटात पार पडला. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या जोडप्यांचे कन्यादान केले.
बीडपासून जवळच असलेल्या पाली येथे एचआयव्ही बाधित मुलांसाठी इन्फंट इंडिया ही संस्था संध्या व दत्ता बारगजे यांनी सुरू केली. येथे लहान मुलांपासुन ते वृद्धांपर्यंतच्या लोकांचा सांभाळ केला जातो. अशीच चार मुले इन्फंटमध्ये वयाच्या अवघ्या पाच ते दहाव्या वर्षी दाखल झाली. सोबतच लहानाचे मोठे झाल्याने एकमेकांमध्ये त्यांची मने गुंतली होती. हाच धागा पकडून त्यांची रेशीमगाठ आयुष्यभरासाठी बांधण्याचा निर्णय घेतला. याला मुले व मुलींना प्रतिसाद दिला. त्यामुळे या दोन्ही जोडप्यांचा मंगळवारी दुपारी थाटात विवाह लावण्यात आला.
दरम्यान, यातील दोन्ही मुलींना आई-वडील नाहीत. बारगजे दाम्पत्यानेच त्यांचा सांभाळ केला. मंगळवारी विवाहानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे कन्यादान केले. यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, वाल्मिक कराड, सूर्यभान मुंडे, निलेश लोहिया, अविनाश नाईकवाडे, प्रा.निलेश आघाव, शिवलिंग मोराळे, तत्वशील कांबळे आदींची उपस्थिती होती.
रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर
इन्फंट इंडिया ही संस्था मुख्य रस्त्यापासून दोन किमी उंच डोंगरावर आहे. येथे जायला रस्ता नाही. पावसाळ्यात खुप त्रास होतो. या लहान मुलांना रस्ता नसल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. हाच धागा पकडून पालकमंत्री मुंडे यांनी नियोजन समितीच्या माध्यमातून रस्ता कामासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर केल्याची घोषणा केली. तसेच नाथ प्रतिष्ठानकडून प्रत्येक वर्षी ५ लाख रुपये देण्याचे अश्वासनही मुंडे यांनी दिले.
यापूर्वी ७ विवाह, शिवकन्याचा वाढदिवसही जोरात
याच संस्थेत आतापर्यंत ७ विवाह पार पडले आहेत. त्यात मंगळवारच्या दोनची भर पडल्याने आता ही संख्या ९ झाली आहे. याच सात पैकी एका जोडप्याला मुलगी झाली. तिचा अहवाल एचआयव्ही निगेटिव्ह आला. काही दिवसांपूर्वीच या मुलीचे शिवकन्या असे नामकरण झाले होते. मंगळवारी विवाह सोहळ्यातच या शिवकन्याचा वाढदिवस जोरात साजरा करण्यात आला. यावेळी मुंडेंनी शिवकन्याला केकही भरविला.