बीड : आष्टीतील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडच्या टेंभुर्णी गावातील एका व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज रुपयांचे व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. याची यंत्रणेने चौकशी केली पाहिजे. यात आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवून त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराडवर नाव न घेता टीका केली. जिल्ह्यात घडणाऱ्या सर्व प्रकरणांच्या मागे ‘आका’ असल्याचेही ते म्हणाले. शुक्रवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. आ. धस यांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले असून, सातत्याने ते धनंजय मुंडेंवर निशाणा साधत आहेत. आता त्यांनी महादेव ॲपच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. याची लिंक थेट मलेशियापर्यंत आहे. बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला, असा दावाही धस यांनी केला.
जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या, कुठल्याही घटना घ्या, त्याच्या मागे एकच ‘आका’ असतो. ‘गँग्स ऑफ वासेपूर’सारखी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.
३०० वीटभट्ट्या अवैध
शिरसाळा गावात गायरान जमिनीवर कब्जा करून गाळे बांधले. शिरसाळा येथे ६०० वीटभट्ट्या चालतात, पैकी ३०० अवैध आहेत. गायरान जमिनीवर बंजारा व पारधी समाजातील लोकांची घरे होती. पोलिस लावून त्यांना हाकलले आणि गायरान जमिनीवर कब्जा केला. कुठे १०० एकर, कुठे १५० एकर... अशा कोट्यवधी रुपयांच्या जमिनी ‘आका’च्या नावावर आहेत. हा पैसा कुठून आणला? असा सवालही धस यांनी केला.
कराडची प्रशासनात दहशत : आ. सोळंके
खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड याची प्रशासनात दहशत आहे, असा आरोप अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला आहे. सरंपच हत्येतील आरोपींना अजूनही अटक होत नाही. कोणाचा तरी राजाश्रय असल्याशिवाय या गोष्टी होतात का? असा सवालही त्यांनी केला.
बीडमध्ये आज मोर्चा
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने शनिवारी बीड शहरात माेर्चा काढण्यात येणार आहे. यात विरोधी, सत्ताधारी पक्षांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.