- संजय खाकरे परळी : तोंडाला रुमाल बांधलेल्या पाच जणांनी मोटर सायकल आडवून ,बंदुकीचा धाक दाखवून शहरातील औद्योगिक वसाहतीतील ऑफिस जवळून तरुण उद्योजक अमोल विकासराव डुबे यांचे सोमवारी रात्री ९ वाजता पांढऱ्या रंगाच्या कारमधून परळी - अंबाजोगाई रस्त्यावरील घाटात नेले होते. तेथे दोन कोटीची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून सोन्याचे लॉकेट, १० तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट व नगदी तीन लाख 87 हजार रुपये रक्कम प्राप्त झाल्यानंतर रात्री ११.३० वाजता डूबे यांची खंडणीखोरांनी सुटका केली. दरम्यान, या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी अमोल डूबे यांच्या तक्रारीवरून परळी शहर ठाण्यात पाच जणांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, येथील नाथ रोडवरील श्री वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीत उद्योजक भाजपाचे जुने कार्यकर्ते व वैद्यनाथ अर्बन बँकेचे माजी चेअरमन विकास राव डूबे यांचे चिरंजीव अमोल डूबे यांचे नामांकित कंपनीच्या ऑइलचे डिस्ट्रीब्यूटरचे ऑफिस आहे. सोमवारी रात्री हिशोब करून नऊ वाजेच्या दरम्यान अमोल डूबे हे ऑफिसमधून दुचाकीवर निघाले. काही अंतर जाताच एका कारने त्यांचा रस्ता अडवला. कारमधून चौघे उतरले. त्यांनी बंदुकीच्या धाकावर डुबे यांना कारमध्ये बळजबरी बसायला जावून अपहरण केले. वडार कॉलनी ,आझाद चौक मार्गे व परळी -अंबाजोगाई रस्त्यावरील घाटात नेले. तेथे २ कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी करत जीवेमारण्याची धमकी दिली.
अमोल डूबे यांनी आपल्या गाडी चालकास फोन करून तीन लाख रुपये नगदी, सोन्याचे बिस्कीट परळी जवळील एका हॉटेल जवळ मागून घेतले. त्यानंतर तीन लाख 87 हजार रुपये, दहा तोळे सोन्याचे बिस्कीट, गळ्यातील लॉकेट घेतल्यानंतर डुबे यांना अंबाजोगाई मार्गावरील घाटात रात्री साडेअकराच्या सुमारास सोडून दिले. दरम्यान, कन्हेरवाडी घाटात आरोपींची कार दोन वेळेस बंद पडली होती. आतील काहीजण खाली उतरले व धक्का देऊन गाडी चालू केली . त्यानंतर अंबाजोगाई मार्गावरील घाटात पुन्हा कार बंद पडली. तेव्हा आरोपींनी दुसरी काळ्या रंगाची कार मागविण्यात आली. त्यात बसून ते पाच जण अंबाजोगाई कडे निघून गेले. मंगळवारी सकाळी अमोल डूबे व त्यांचे वडील विकासराव डूबे यांनी परळी शहर पोलिस ठण्यात येवून पोलीसाना हा प्रकार सांगितला. फिर्याद दाखल केली.
आरोपींचा शोध सुरूउद्योजक अमोल डूबे यांनी खंडणी ची फिर्याद दाखल केली. परळी शहर पोलिसांनी अज्ञात पाच आरोपी विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींचा शोध घेण्यात येईल.अशी माहिती परळीचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी दिली.
कडक कारवाई करावीमाझ्या बॅग मधील 87 हजार रुपये. गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, तसेच ड्रायव्हरच्या हातून कन्हेरवाडी येथील हॉटेलजवळ मागविलेले तीन लाख रुपये आणि दहा तोळे सोन्याचे बिस्कीट असे एकूण आठ लाख 28 हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज दिल्यानंतर पाच जणांनी कन्हेरवाडी घाटात सुटका केली. त्यानंतर मी माझी गाडी मागून घेतली व परळीला आलो. याप्रकरणी आरोपीविरुद्ध कडक कारवाई करावी -अमोल डूबे, उद्योजक, परळी