बीड : वडवणी येथील न्यायालयात सरकारी वकील व्ही. एल. चंदेल (रा. इंधेवाडी, जि. परभणी) यांनी आत्महत्या केली असली तरी, हा प्रकार घातपात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. चंदेल यांच्या मुलाने वडिलांवर मानसिक छळ आणि कामाचा ताण असल्याचा दावा केला असून, न्याय मागण्याच्या ठिकाणीच वडिलांनी हे पाऊल उचलल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. तर चंदेल यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवर मौन बाळगल्याने आणि कोणतीही कारवाई न केल्याने वडवणी पोलिस वादात सापडले आहेत.
मयत चंदेल यांचा मुलगा विश्वजित याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘कोणताही व्यक्ती घरात किंवा एकांत ठिकाणी आत्महत्या करतो, पण माझ्या वडिलांनी न्याय मागण्याच्या ठिकाणी आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटनुसार योग्य ती कारवाई उच्च पातळीवर झाली पाहिजे.’ वडिलांना सतत मानसिक त्रास, तणाव आणि ऑफिसचा मोठा दबाव जाणवत होता, असेही त्याने नमूद केले. वडिलांसोबत शेवटचे बोलणे परवा रात्री झाले होते, असेही त्याने स्पष्ट केले.
मयत चंदेल यांचे आतेभाऊ आनंदराव कच्छवे यांनी तर या घटनेला ‘ठरवून केलेला घातपात’ असे संबोधले. ‘वकील साहेब अत्यंत इमानदार होते. वकिली पेशात इमानदारीला महत्त्व नसते, त्यामुळे हा प्रकार घडला असावा,’ असा आरोप त्यांनी केला. पोलिसांच्या कार्यवाहीवरही त्यांनी संशय व्यक्त केला. ‘घरातून कुणीही पोहोचण्याआधीच पोलिसांनी डेथ बॉडी काढली आणि पंचनामा केला,’ असे त्यांनी म्हटले. तसेच, ‘सुसाईड नोटची सत्यता आम्हाला अजूनही माहीत नाही, त्यात बदल केला असावा,’ असा संशयही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मयत चंदेल यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
वेळ पडली तर उपोषण करूया घटनेचा निषेध करत कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे. ‘याची सीबीआय चौकशी व्हावी, या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. गरज पडल्यास, योग्य न्याय मिळेपर्यंत आम्ही उपोषण करू,’ असा इशाराही कच्छवे यांनी दिला आहे.
वर्षा व्हगाडे येणार अडचणीतसरकारी वकील चंदेल त्यांच्या खिशामध्ये निघालेल्या सुसाईट नोट संदर्भात वडवणी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांना विचारणा केली असता गुन्हा दाखल झाल्यावर त्या संदर्भातली तुम्हाला माहिती देऊ असे सांगत त्यांनी पुन्हा माहिती देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांवर कुटूंबियांनी आरोप केल्याने ठाणेदार असलेल्या व्हगाडे या देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.