खड्डे बुजवून रस्त्यांची मागणी
बीड : शहरातील सहयोगनगर, शाहूनगर, आदर्शनगर भागांतील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा आकार वाढला आहे. त्यामुळे पादचारी, वाहन चालक त्रस्त आहेत. दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून होत आहे.
भाजी मंडईतील कोंडी हटेना
बीड : शहरातील भाजी मंडईत प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो, परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
कोंडवाडा दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे, परंतु त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. कोंडवाडा दुरुस्त करून मोकाट गुरांना त्यात कोंंडावे, अशी मागणी होत आहे.
नेकनूर-पोथरा रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील नेकनूर ते पोथरा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नेकनूर हे आठवडी बाजाराचे गाव असल्यामुळे रहदारी जास्त असते. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. म्हणून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या संदर्भात वेळोवेळी प्रशासनास निवेदन देऊनही दुर्लक्ष होत आहे.