बीड : शहरातील संत भगवानबाबा प्रतिष्ठान येथील स्मशानभूमीमध्ये असलेल्या घरात शनिवारी रात्री चोरी झाली. यावेळी चोरट्याने रोख २७ हजार ५०० रुपये, मोबाइल, लॅपटॉप असा जवळपास ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा करून गुन्हा दाखल केला.
नगरपालिकेच्या वतीने दीपक चंदन सेनुरे व संतोष सागवाने हे दोघे संत भगानबाबा प्रतिष्ठान येथील स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करतात. त्यामुळे ते दोघेही स्मशानभूमी परिसरात असलेल्या दोन खोलीत राहतात. हे दोघे शनिवारी रात्री एका खोलीत झोपले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने दुसऱ्या खोलीत शिरून नगदी २७ हजार ५०० रुपये व लॅपटॉप, मोबाइल व इतर साहित्य चोरले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी पोलिसांनी रविवारी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळापासून काही अंतरावर पाहणी केली असता, कागदपत्र आणि लॅपटॉप बिंदुसरा नदीमध्ये फेकून दिल्याचे आढळून आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
===Photopath===
110421\11_2_bed_12_11042021_14.jpg
===Caption===
स्मशानभूमीत फेकलेला लॅपटॉप मिळून आला,