बीड : शिक्षणासाठी बाहेर ठेवलेला मुलगा दहावीला असताना रागाच्या भरात २०१७ साली निघून गेला. त्यानंतर २०२३ मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. परंतु, पोलिसांना सापडत नव्हता. दोन दिवसांपूर्वी तो पुण्यात असल्याचे समजताच पोलिसांनी शोध घेत त्याला बीडला आणले. त्यानंतर आई-वडिलांना तपासात मदत हवीय म्हणून बोलावून घेतले. पोलिस अधीक्षकांसमोर चर्चा सुरू असतानाच मुलाला समोर आणत बीड पोलिसांनी ‘सरप्राईज गिफ्ट’ दिले. यावेळी मुलासह सर्वच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. पोलिसांचेही डोळे पाणावले होते.
राजू काकासाहेब माळी (वय २४, रा. खळवट लिमगाव, ता. वडवणी) असे या मुलाचे नाव आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. त्याला शिक्षणासाठी नाळवंडी (ता.बीड) येथे ठेवले होते. २०१७ साली तो शिक्षणाचा कंटाळा आणि रागाच्या भरात निघून गेला. नातेवाईकांनी सहा वर्षे शोध घेतला, पण तो मिळून आला नाही. त्यामुळे पिंपळेनर पोलिस ठाण्यात २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता. हा तपास एएचटीयूलाही लागला नाही. त्यामुळे आठवड्यापासून स्थानिक गुन्हे शाखेने यात लक्ष घातले. तो पुण्यात असल्याचे समजताच पथक गेले आणि त्याला शोधून आणले. शुक्रवारी सकाळी आणल्यानंतर दुपारी त्याला आई-वडिलांसमोर उभा केले. यावेळी सर्वांनाच आनंदाश्रू अनावर झाले.
पुणे-गुजरात-पुणे झाला प्रवास२०१७ साली बीड सोडून राजूने पुणे गाठले. सुरक्षा रक्षकाची नोकरी केली. त्यानंतर वेल्डिंगचे काम शिकून गुजरातला गेला. खोली करून राहिला. आठवड्यापूर्वी पुन्हा पुण्यात आला. हे एलसीबीचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना समजले. त्यांनी पथकासह जाऊन त्याला आधार देत बीडला आणले.
मुलाची पालकांसोबत ‘फिल्मी स्टाईल’ भेटराजूच्या आई-वडिलांसह आजोबांनाही तपासात मदत हवी म्हणून बीडला बोलावले. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासमोर ते चर्चा करत होते. अचानक उपनिरीक्षक श्रीराम खटावकर हे राजूला घेऊन आले. एक मिनीट आई आणि राजू एकमेकांना पाहत होते. जेव्हा ओळख पटली तेव्हा राजूने आईचे दर्शन घेतले आणि मिठी मारत रडू लागला. यावेळी एसपींसह सर्वच अधिकाऱ्यांचे डोळे पाणावले होते. राजूच्या नातेवाईकांनी बीड पोलिसांना हात जोडत आभारही मानले. हा सर्व प्रकार चित्रपटाला लाजवेल असा होता.
मुलाच्या घातपाताचा संशयपोटचा गोळा सापडत नसल्याने आई-वडिलांना त्याचा घातपात झाल्याचा संशय आला. तसेच त्याचा मृत्यू झाला असेल की काय? असे वाटले. पण, शुक्रवारी जेव्हा आठ वर्षांनी लेकराला समोरासमोर पाहिले तेव्हा सर्वांनाच आनंदाश्रू अनावर झाले. एसपींच्या कक्षेतून बाहेर पडल्यावरही ही स्टोरी ऐकून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
या पथकाने केली कामगिरीपोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक, शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पल्लवी जाधव, असिफ शेख, आनंद मस्के, अशोक शिंदे, विक्की सुरवसे, अर्जुन यादव, सिद्धेश्वर मांजरे आदींनी केली.