- नितीन कांबळेकडा ( बीड) : तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून अनेक गावात अद्यापही पाणी मिळाले नाही, या गैरकारभाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत मनसे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी आष्टी पंचायत समितीसमोर पोतराजाचा पोषाख परिधान करत सोमवारी सकाळी ' कोंबड घ्या पण जलजीवनचे पाणी द्या' असे अनोखे आंदोलन करून लक्ष वेधून घेतले.
आष्टी तालुक्यामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १७२ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्याचे कामे सुरू आहेत. यामध्ये १५९ गावांमध्ये पूर्वी असलेल्या पाणीपुरवठा योजना दुरुस्त करून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी कामे सुरू आहेत तर केवळ तेरा गावांमध्ये पाणीपुरवठा योजना ही पूर्णपणे नवीन आहे. असे असतानाही संबंधित गुत्तेदारांकडून शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये योजनेचे काम पूर्ण होताना दिसत नाही.
आतापर्यंत आष्टी तालुक्यातील केवळ ४६ गावांमध्ये जल जीवन मिशन योजनेचे काम शंभर टक्के पूर्ण झालेले आहे. यामध्ये पूर्णपणे नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणाऱ्या गावांची संख्या फक्त तीन आहे. ५२ गावांमध्ये जलजीवन मिशनच्या कामामध्ये गुत्तदारांकडून दिरंगाई होताना दिसत आहे तर १६ गावांमध्ये संबंधित गुत्तेदारांनी कामच सुरू केले नाहीत. ज्या गुत्तेदारांनी कामे सुरू केले नाहीत व कामांमध्ये दिरंगाई केले आहे अशा गुत्तेदारांवर कारवाई करून काळ्या यादीत त्याचा समावेश करावा अशी मागणी कैलास दरेकर यांनी अनोखा आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.