लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा ‘आका’ असल्याचे आरोप झाल्यानंतर आता आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याचे एकेक कारनामे समोर येऊ लागले आहेत.
सतीश उर्फ खोका भोसले याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये तो शिरूरमधील एका महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना हात-पाय तोडण्याची धमकी देत असल्याचे दिसत आहे. यावेळी प्राचार्यांसह इतर कर्मचारीही उपस्थित आहेत.
एका व्यक्तीला अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण करणे, बापलेकावर सत्तूर तसेच कुऱ्हाडीने वार करणे याचे दोन व्हिडीओ ताजे असतानाच याप्रकरणी खोक्याचा हा आणखी एक नवा कारनामा समोर आला. यामध्ये तो शिरूरमधील कालिकादेवी महाविद्यालयामध्ये जाऊन प्राचार्य, प्राध्यापकांसमोर विद्यार्थ्यांना हात-पाय तोडण्याची धमकी देत आहे. या प्रकरणाची अद्यापही नोंद नाही. यावरून संताप व्यक्त होत आहे.
खोक्याच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे आ.सुरेश धस यांनी खोक्याला कॉल केला होता. याची एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे.हि ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्यामुळे आज दिवसभरात खळबळ उडाली.
काळवीट शिकार
दिलीप ढाकणे व महेश ढाकणे या बाप-लेकाला हरणाची शिकार करण्यापासून राेखले म्हणूनच प्राणघातक हल्ला केला होता. दुसऱ्या दिवशी परिसरात हरीण, काळवीटासह इतर प्राण्यांचे अवशेष सापडले. या शिकारी खोक्याने केल्याचा आरोप आहे.
पैसे कुठून आले?
खोका हेलिकॉप्टरमधून उतरणे,फा इव्ह स्टार हॉटेल, गळ्यात किलोभर सोने, नोटांचा माज दाखवतो. त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.
काय म्हणतोय भोसले?
ज्यावेळेस सर काही करणार नाहीत, त्यावेळी माझ्या हाताने तुमची गय होणार नाही. तुमचे हातपाय मोडून जेलमध्ये जायला तयार आहे. पहिलेच माझ्यावर मोठ्या केसेस आहेत. एखाद्या लेकराबाळामुळे माझ्यावर केस झाल्याने मला काही फरक पडत नाही, असे तो व्हिडीओत म्हणतोय.
धस म्हणाले, १००२% आशीर्वाद
खोक्याच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे आ.सुरेश धस यांनी खोक्याला कॉल केला होता. याची एक कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली आहे. यात ‘खोक्या, माझा तुला ९९ नव्हे १००२ टक्के आशीर्वाद आहे’, असे आ.धस म्हणत आहेत.
मुलींच्या वसतिगृहाकडे काही मुले जात होती. त्यांच्या तक्रारी आल्याने सकाळी प्रार्थनावेळी मी मुलांना सूचना केल्या. यावेळी सतीश भोसले हा तेथे आला. थोडावेळ चांगला बोलला, परंतु शेवटी तो हातपाय तोडण्याचेच बोलला. त्याच्या तोंडाला काय हात लावणार का? हा व्हिडीओ १८ ऑक्टोबर २०२४ चा आहे. यात तक्रार दिली नाही. - ए. बी. येवले, प्राचार्य, कालिकादेवी महाविद्यालय, शिरूर