साष्टपिंपळगावच्या आंदोलनास मालेगावातून पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:20 AM2021-02-05T08:20:27+5:302021-02-05T08:20:27+5:30
गेवराई : मराठा आरक्षणप्रश्नी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे २० जानेवारी रोजी सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाचे लोण गेवराई ...
गेवराई : मराठा आरक्षणप्रश्नी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे २० जानेवारी रोजी सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाचे लोण गेवराई तालुक्यात पोहोचले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मालेगाव येथे सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू झाले. यामध्ये गावातील अबालवृद्धांसह अनेक जण सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी या आंदोलनाला कै.अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आ.लक्ष्मण पवार, माजी आ. राजेंद्र जगताप, रमेश पोकळे, बीड मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे समन्वयक सीए. बी .बी. जाधव, अशोक हिंगे यांच्यासह परिसरातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.
आंदोलनाचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील- नरेंद्र पाटील
मराठा आरक्षण प्रलंबित निर्णयप्रश्नी साष्टपिंपळगाव येथून सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाची ठिणगी राज्यभरात पसरणार असून याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी सरकारला दिला. भाजप सरकारच्या काळात मराठा क्रांती मोर्चाने सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले आणि समाजाला आरक्षण देण्यात आले. मात्र, आरक्षण प्रश्न सध्या कोर्टात आहे. त्यामुळे आजपर्यंत कुठलाच निर्णय झाला नाही. त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा लढा उभारावा लागेल आणि या लढ्याची सुरुवात साष्टपिंपळगाव आणि मालेगाव ग्रामस्थांनी सुरू केली असून यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे. आंदोलन पेटण्याच्या आत सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा, असेही पाटील म्हणाले.