दिवसा वीजपुरवठा करा
शिरूर कासार : वीजपुरवठाबाबत सातत्याने शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. रात्री १२ ते सकाळी ८ ही वेळ अत्यंत धोक्याची असून, शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकरी सध्या रब्बी हंगाम पदरी पाडून घेण्यासाठी प्रयत्न करतोय. याकडे लक्ष देऊन दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
पार्किंगने वाहनकोंडी
पाटोदा : शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनधारक वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त पार्किंग करीत आहेत. यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे लक्ष नसून, यावर नियंत्रणाची मागणी आहे.
प्रदूषण कायदा दिसेना
अंबाजोगाई : तालुक्यात दुचाकी, ऑटोरिक्षा व इतर वाहनांमध्ये इंधन म्हणून रॉकेलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे ही वाहने मोठ्या प्रमाणात धूर सोडून वातावरण प्रदूषित करीत आहेत. प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस वाहतूक यंत्रणा यांनी एकत्रित येऊन अशा वाहनांचा शोध घेऊन प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.