बीड : येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेतर्फे २ फेब्रुवारी रोजी राज्यातील महाविद्यालय उघडण्याकरिता राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे १७ मार्च २०२० पासून राज्यभरात महाविद्यालये बंद आहेत. गत शैक्षणिक वर्षाचे निकाल घोषित होऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली आणि विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी विविध महाविद्यालयात प्रवेश घेतला. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू होतील, असे अपेक्षित असताना अद्यापही प्रत्यक्ष शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू झालेले नाहीत. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू करण्यास शासनाची चालढकल सुरू आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा, त्याची परिणामकारकता इत्यादी बाबींकडे सपशेल दुर्लक्ष करून शासन झोपेचे सोंग करत आहे. तसेच राज्य सरकारद्वारे दारूची दुकाने, मॉल, सिनेमा गृह व परिवहन सेवा आणि राज्यातील पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू केले आहे, मग महाविद्यालये बंद का, असा प्रश्न विद्यार्थी परिषद राज्य सरकारला विचारत आहेत.
महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. महाविद्यालये लवकरात-लवकर सुरू करावी अशी मागणी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली. शहरातील श्री बंकटस्वामी महाविद्यालय, केएसके महाविद्यालय, बलभीम महाविद्यालय, सावरकर महाविद्यालयामध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांनी ‘शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘सामंत साहेब हमको पढने दो, देश को आगे बढने दो’, ‘शुल्क सर्व; पण महाविद्यालय बंद’, ‘मद्यालय सुरू; पण महाविद्यालय बंद’ अशी जोरदार घोषणाबाजी व निदर्शने केली.
यावेळी शहर मंत्री मयूर डोरले, विद्यार्थिनी प्रमुख श्रावणी माने, व्यंकटेश खडके, महादेव घोडके, सुरेश माटे, गणेश भस्करे, अजय आंधळे, रितेश शिंदे, सिद्धांत साळवे, अर्जुन बारंगुळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.