बीड : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नाइटेड माईंड चिल्ड्रन क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड-२०२५ साठी शहरातील सहयोगनगर येथील राजस्थानी विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी पृथ्वीराज भाऊसाहेब राणे याची निवड झाली. त्याच्या मॉडर्न सीट कव्हर फॉर टू व्हीलर्स या उपयुक्त आणि नावीन्यपूर्ण संशोधन संकल्पनेस हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हा मान मिळवणारा बीड जिल्ह्यातील तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे.
पुरस्काराची घोषणा नुकतीच ऑनलाइन पद्धतीने भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि हनी बी नेटवर्कचे संस्थापक अध्यक्ष प्रो. अनिल गुप्ता यांच्या उपस्थितीत करण्यात आली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, हनी बी नेटवर्क आणि डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत सरकारच्यावतीने दिला जातो. डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्मृतिचिन्ह, संशोधन प्रोटोटाईपसाठी आर्थिक मदत, पेटंट रजिस्ट्रेशन तसेच तयार उत्पादन बाजारात आणण्यासाठी स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण अर्थसाहाय्य भारत सरकारतर्फे दिले जाणार आहे. लवकरच हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहे. पृथ्वीराजच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, सीईओ जितीन रहमान, राज्य विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. राजकुमार अवसरे, शिक्षणाधिकारी (मा.) प्रियाराणी पाटील, डॉ. किरण कुंवर शिक्षणाधिकारी आदींनी कौतुक केले.
स्मार्ट सीट कव्हर फॉर टू व्हीलर्स...साधारणतः मार्चपासून ऊन वाढते. त्यामुळे दुचाकी बाहेर पार्क किंवा कामानिमित्त कोठेही उभी केल्यानंतर प्रचंड उन्हामुळे सीट कव्हर गरम होते. तर पावसाळ्यात दुचाकी बाहेर पार्क केल्यानंतर सीट कव्हर ओले होते. या दोन समस्यांचे निराकरण करण्यासाठी वडील विज्ञान शिक्षक असल्याने त्यांच्या मार्गदर्शनातून ही संकल्पना मांडल्याचे पृथ्वीराजने सांगितले.
अशी आहे कार्यपद्धतीहे स्मार्ट सीट कव्हर १८० अंशांमध्ये फिरवता येते, त्यामुळे या सीट कव्हरची वरील बाजू फिरवून खाली व खालची बाजू वर करता येते. दुचाकी सीट कव्हरच्या समस्येवर हा रामबाण उपाय ठरेल, असा दावा पृथ्वीराजने केला. मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने मला पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो, असे पृथ्वीराज राणे म्हणाला.
संशोधक वृत्ती, गतवर्षी इन्स्पायर अवाॅर्डपृथ्वीराज याला मुळातच संशोधनाची आवड आहे. गतवर्षी स्मार्ट अडप्टर फॉर सेफ्टी वॉटर हीटर या संशोधनासाठी त्याला इन्स्पायर अवाॅर्ड मिळाले. त्याच्या या प्रोजेक्टचे नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे सादरीकरण केले होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विशेष पुरस्काराने त्याचा गौरव करण्यात आला.
Web Summary : Prithviraj Rane from Beed received the APJ Abdul Kalam National Award for his innovative smart seat cover for two-wheelers, solving heat and rain issues. The award includes financial aid, patent registration, and startup support from the Indian government.
Web Summary : बीड के पृथ्वीराज राणे को दोपहिया वाहनों के लिए स्मार्ट सीट कवर के लिए एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार मिला। यह कवर गर्मी और बारिश की समस्याओं का समाधान करता है। पुरस्कार में वित्तीय सहायता, पेटेंट पंजीकरण और स्टार्टअप समर्थन शामिल है।