बीड : जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी परळी येथील श्री माउली मल्टिस्टेटच्या सचिव संगीता ओमनारायण जैस्वाल हिस १ एप्रिल रोजी औरंगाबाद येथून अटक करण्यात आली. ही कारवाई बीड आर्थिक गुन्हे शाखेने केली. परळीतील रेल्वे स्थानकरोडवरील जैस्वाल कॉम्प्लेक्स येथील श्री माउली मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटीने ठेवीदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवी गोळा केल्या. परंतु मुदत संपूनदेखील ठेवी परत देण्यास मल्टिस्टेटकडून टाळाटाळ करण्यात येत होती. त्यानंतर काही दिवसांतच मल्टिस्टेटने शहरातून गाशा गुंडाळला होता. दरम्यान, अरुण मुळे (रा.नक्षत्रवाडी, औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरून ११ सप्टेंबर २०२० रोजी परळी शहर ठाण्यात १४ ठेवीदारांचे १ कोटी २८ लाख ६६ हजार ६९९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्ष ओमनारायण जैस्वाल, सचिव संगीता ओमनारायण जैस्वाल व विष्णू भागवत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता.
या मल्टिस्टेटचा अध्यक्ष ओमनारायण जैस्वाल याने काही रक्कम नाशिक येथील विष्णू भागवतला हस्तांतरित केली होती. त्यामुळे त्याच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला. २२ जानेवारी रोजी मल्टिस्टेटचा अध्यक्ष ओमनारायण जैस्वाल याला अटक केली होती. नाशिक येथील कारागृहात इतर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात असलेल्या विष्णू भागवतला ८ फेब्रुवारी रोजी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यातील शेवटची फरार आरोपी सचिव संगीता जैस्वाल हिलादेखील अटक करण्यात आली आहे. तिला २ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार अल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख पो.नि. सतीश वाघ, पोह. राजू पठाण, सुरेश सांगळे, कांता मुळे, चालक नितीन वडमारे यांनी केली.
इतर गुन्ह्यांनादेखील मिळणार चालना
ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी काही संस्थांवर गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपासदेखील आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. यापैकी अनेक गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून, लवकरात लवकर याप्रकरणांमधील आरोपींना अटक करून गुन्हे न्यायालयात दाखल करण्याची प्रक्रिया आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून पेंडिंग असलेल्या गुन्ह्यातील ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे.