Beed Murder Case ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला १५ दिवस उलटत आले असले तरी अद्याप तीन आरोपी फरार असल्याने जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली असून यामध्ये २८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात मोर्चा काढण्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक व्हावी, ही या मोर्चाची प्रमुख मागणी असणार आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली.
"संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांना स्व.संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली. बीड जिल्ह्यातील आपल्या बांधवाला न्याय देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशत व जातीयवाद मोडीत काढण्यासाठी या बैठकीत अनेक मत सर्व उपस्थितांनी मांडले. हत्येतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे असे मत या बैठकीत मांडले. यावेळी उपस्थित सर्वांनी एकमताने दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीड मध्ये भव्य मोर्चा काढावा असे ठरवले गेले. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे," अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत. यातील चार अटक असून सुदर्शन घुलेसह तिघे अजूनही फरार आहेत. हाच मुद्दा यावेळी हिवाळी अधिवेशनात गाजला. त्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदलीही करण्यात आला. आता हत्या होऊन १५ दिवस उलटत आले तरी यातील तीन आरोपी मोकाटच आहेत. तसेच या प्रकरणात मास्टरमाईंडही मोकाट असल्याचा आरोप होत आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी थेट वाल्मीक कराड यांचे नाव घेतले होते. असे असतानाही पोलिसांकडून आरोपी अटक होत नसल्याने बीडमध्ये मोर्चा काढण्याचे नियोजित केले होते. त्यासाठीच सोमवारी बैठक घेण्यात आली. यात सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय, सर्व नेत्यांचा समावेश होता. सुरूवातीला देशमुख यांना श्रद्धांजली अर्पन करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करायला हवे असे मत या मांडण्यात आले. त्यासाठीच २८ डिसेंबर रोजी सकाळी मोर्चा काढण्याचे ठरले. हा मोर्चा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप होणार आहे.
मुलीला आश्रू अनावरया बैठकीत संतोष देशमुख यांची १२ वी च्या वर्गात शिक्षण घेणारी वैभवी देखील उपस्थित होती. आपल्या वडिलांची हत्या झाली. मारेकऱ्यांना अटक करून शिक्षा द्यावी, अशी मागणी तिने केली. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. न्याय द्या, सहकार्य करा, अशी विनवणी तिने केली.