बीड : आपण नियमांचे पालन केले, सुरक्षित प्रवास केला तर अपघात होणार नाहीत, कोणाचे प्राण जाणार नाहीत, सडक सुरक्षा हीच जीवन रक्षा आहे असे प्रतिपादन गोपनीय शाखेचे रामराव आघाव यांनी केले.
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर हे होते. व्यासपीठावर शहर ठाण्याचे पोनि रवि सानप, उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. ओमप्रकाश झंवर, जिल्हा समन्वयक डॉ. सोपान सुरवसे, कार्यालयीन अधिक्षक डॉ. प्रशांत तालखेडकर, यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आघाव म्हणाले की सरकारने वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालवताना सर्व कागदपत्रे सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्या जवळ ठेवा, डाव्या बाजूने वाहन चालवा, नियमांचे पालन करून आपण आणि दुसऱ्यांना सुरक्षित ठेवा.
वाहतूक पोलीस शाखेचे सय्यद अशफाक यांनी सांगितले की गाडीवर शासनाच्या नियमात योग्य पद्धतीने नंबर असायला पाहिजे. ओव्हरटेक करताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियम पाळणे तर आपण सुरक्षित राहू असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. बाहेगव्हाणकर यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेने विमोचन केलेल्या ‘प्रेरक बापू’ या पुस्तिकेचा उल्लेख करत स्वच्छता, स्वावलंबन, आणि स्वदेशी या गांधीजींच्या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे सांगून रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती ती करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले .
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. ओमप्रकाश झंवर, सूत्रसंचालन डॉ. संगीता ससाने यांनी केले. कार्यक्रमाला भागवत घोडके, सय्यद इलियास यांच्यासह रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.