लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शिवसेना जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून गुरुवारी माजलगाव येथे दोन गटांत राडा झाला. यावेळी काढलेल्या मिरवणुकीदरम्यान शिवसेनेच्या शहर प्रमुखास कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसांपूर्वी
शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदी निवड झाली होती. ही निवड चुकीची झाली असल्याचा आरोप दुसऱ्या गटाने केला होता. दरम्यान, गुरुवारी मिरवणुकीदरम्यान शिवसेनेचे शहराध्यक्ष धनंजय सोळंके यांनी जिल्हाप्रमुखांच्या वाहनावर शाई टाकल्याने कार्यकर्त्यांनी धनंजय सोळुंके यांना जबर मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव यांची दोन दिवसांपूर्वी माजलगाव ,परळी व केज तालुक्याच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. निवड होताच शहर प्रमुख धनंजय उर्फ पापा सोळुंके यांनी सोशल मीडियावर याचा निषेध नोंदवला होता.
गुरुवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास अप्पासाहेब जाधव हे मुंबईहून आले असता त्यांची केसापुरी वसाहत या ठिकाणाहून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान पापा सोळंके यांनी संभाजी चौकात जिल्हाध्यक्षांच्या वाहनावर शाई फेकली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी पापा सोळुंके यांना खाली पाडून बेल्ट, वायर व पाइपने मारहाण केली. यावेळी पापा सोळुंके यांच्या डोक्याला व पाठीला जबर मार लागला आहे.
धनंजय सोळंके यांच्या फिर्यादीवरून मुंजा कडाजी जाधव, माउली गायके, महादेव वैराळे, सुखदेव धुमाळ, सुरेश पास्टे व इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
....
माझ्यावर हात उचलणारे शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक होऊ शकत नाहीत.
खऱ्या शिवसैनिकाला न्याय न देता आता पक्षात आलेल्यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. याचा दोन दिवसांपूर्वीच मी निषेध केला होता. आता जोपर्यंत जिल्हाध्यक्ष पदावरून आप्पासाहेब जाधव यांना बडतर्फ केले जात नाही. तोपर्यंत माझे आंदोलन सुरूच राहणार आहे. ३० जून रोजी याविरोधात मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे.
-धनंजय सोळंके, शिवसेना शहरप्रमुख, माजलगाव
....
माझे कार्य पाहून पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी जिल्हाध्यक्षपदी निवड केली. माझी निवड झाल्यानंतर धनंजय सोळंके यांनी चौकांमध्ये माझ्याविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला होता. तरीही मी काहीच बोललो नाही. गुरुवारी माझ्या मिरवणुकीदरम्यान याने वाहनावर शाई टाकल्याने कार्यकर्त्यांनी त्यास पकडून चोप दिला. धनंजय सोळंके यांच्या पाठीमागे माजी जिल्हाप्रमुखांची फूस आहे.
-आप्पासाहेब जाधव, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, शिवसेना
....