बीड : जिल्ह्यात सीसीआय, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व खाजगी अशी एकूण ६ लाख ४९ हजार ८४२ क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. शासकीय हमीदराने कापूस विक्रीसाठी नोंदणीची मुदत ४ जानेवारीपर्यंत ठेवली आहे.
जिल्ह्यात कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ मध्ये शासकीय हमीभावानुसार कापूस खरेदी सीसीआय व महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्यामार्फत सुरू आहे. सीसीआयच्या वतीने बीड तालुक्यात ११ जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्र, गेवराई येथील ७ जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर व वडवणी येथील २ जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. तर महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत माजलगाव तालुक्यात ४, परळी तालुक्यात १ ,केज तालुक्यात ४, धारुर तालुक्यात ६ अशा एकूण १५ जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे.
केंद्र अपुरे पडत असल्याने जिल्ह्यात पणन महासंघाच्या परळी तालुक्यात ४, माजलगाव- ५,केज १ व आष्टी तालुक्यात १ अशा एकूण ११ कापूस खरेदी केंद्रांना नव्याने मंजुरी मिळालेली आहे. या ठिकाणी १६ ग्रेडरची नियुक्ती केलेली आहे. जिल्ह्यात १९ डिसेंबरपर्यंत ६६ हजार ७४६ शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस शासकीय हमीभावानुसार विक्री करण्यासाठी संबंधित बाजार समित्यांकडे आवश्यक कागदपत्रासह नोंदणी केली आहे.
जिल्ह्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधींकडून कापूस नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी पुढे आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांत शेतकऱ्यांना त्यांच्या विक्रीयोग्य कापसाची नोंद करण्याची मुदत ४ जानेवारीपर्यंत वाढविली आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या बाजार समितीकडे नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.
२१ तारखेपर्यंतची खरेदी
२१ डिसेंबरअखेर बीड, गेवराई, वडवणी या तीन तालुक्यांत २ लाख ४३ हजार ५९४ क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. तर केज, परळी, धारूर, माजलगाव तालुक्यांत २ लाख ६४ हजार ७१ क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांकडून १ लाख ४२ हजार १७७ क्विंटल कापूस खरेदी झालेली असून सीसीआय, पणन महासंघ व खाजगी खरेदी अशी ६ लाख ४९ हजार ८४२ क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे.
शेतकऱ्याच्या नावावर व्यापाऱ्याचा कापूस
सुट्यांमुळे कापूस खरेदी बंद होती. यादरम्यान व्यापाऱ्यांचा कापूस काही खरेदी केंद्रांवर खरेदी केल्याचे वृत्त आहे. बीड तालुक्यातील एका जिनिंग केंद्रावर व्यापाऱ्याचा २ हजार क्विंटल कापूस आणून टाकला होता. शेतकऱ्यांना पुढे करून दलाल व्यापारी सरकारी योजनेचा गैरफायदा घेत असून लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता आणि शेतकऱ्यालादेखील हजर करत असल्याने व्यापाऱ्यांवर कारवाई करणे अशक्य होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीसीआयचे केंद्र असलेल्या बड्या जिनिंगवर बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी अचानक तपासणी करून पंचनामा व चित्रीकरण केल्याचे समजते. या पंचनाम्याचे पुढे काय होते याकडे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्याचा कापूस घालणाऱ्यांवर कोणती कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे.