बीड : शहरामध्ये सध्या वाहतूक पोलीस विभागाकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. याअंतर्गत जनजागृती करणारे स्टिकर्स रिक्षावर चिकटविण्यात आले. यावेळी पो.ना. संजय सोनवणे, पो.कॉ. महेश खाडे, पो.ना. पद्मनाभन टाकणखार, पो.हे. बाबूराव जमशेटे एएसआय वालवडकर, गणेश मैड आदी उपस्थित होते.
अवैध वाळू उपसा, गाव रस्ते झाले खराब
गेवराई : तालुक्यातील नदीपात्राशेजारील अनेक गावांमधून अवैध वाळू उपसा होत आहे. यामुळे गाव रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब होत असून, ग्रामस्थांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
शिरूर कासार : तालुका आणि परिसरात अनेक वेळा वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. विजेवर आधारित व्यवसायांना अडथळा निर्माण होत असून, शेतीला पाणी देणेही अवघड बनले आहे. सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी आहे.
होर्डिंग्ज, बॅनर्स हटविण्याची मागणी
बीड : शहरात अनेक ठिकाणी लावलेले बॅनर्स, होर्डिंग्जमुळे समोरून ये-जा करणारी वाहने दिसणे अवघड बनले आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन असे होर्डिंग्ज, बॅनर्स हटवावेत, अशी मागणी होत आहे.
काढलेली अतिक्रमणे पुन्हा थाटली
बीड : शहरातील विविध भागांमध्ये नगरपालिकेच्या वतीने मोहीम राबवीत अतिक्रमणे काढण्यात आली. त्यामुळे बहुतांश भागातील रस्ते खुले झाले. मात्र, चार दिवसांतच पुन्हा अतिक्रमण थाटण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पालिकेला कडक मोहीम राबवावी लागणार आहे.