बीड : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे बीड जिल्हा प्रशासनाने १० दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले आहे. त्याला विरोध करत दोघांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी केली. यावेळी बाटलीतून ज्वालाग्रही पदार्थ अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
धम्मानंद वाघमारे व नितीन सोनवणे अशी आंदोलन करणाऱ्यांची नावे आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानंतर काही राजकीय पक्षांनी व संघटनांनी या निर्णयाचा विरोध केला. मध्यरात्रीपासून ल़ॉकडाऊन लागल्यानंतर शुक्रवारी बंदचा पहिला दिवस होता. यावेळी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यावेळी सोनवणे व वाघमारे हे दोघे जिल्हाधिकारी परिसरात आले. त्यानंतर बाटलीतून ज्वालाग्रही पदार्थ अंगावर ओतून घेत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या लॉकडाऊनचा फटका गोरगरीब कामगारांना बसत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा, असे पत्रही या दोघांनी यावेळी दिले. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
===Photopath===
260321\262_bed_20_26032021_14.jpg
===Caption===
जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊनला विरोध करत आंदोलन करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.