लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी दहा विविध वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांमध्ये जवळपास २५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र या कपंन्यांकडून दगाफटका झाला. सर्व कंपन्या सेबीच्या अधिपत्याखाली होत्या. सर्व कंपन्यांच्या बाबतीत न्यायालयाने ग्राहकांच्या बाजुने निकाल दिलेला आहे. तसेच सरकारकडे वारंवार पाठपुरवा करुनही रक्कम न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.मुलामुलींचे भविष्य, त्यांचे लग्न, शिक्षण, वैद्यकीय उपचार व इतर कामासाठी ही रक्कम कामी येईल असे स्वप्न बाळगून ही गुंतवणूक केली होती. मात्र ५ वर्ष होऊनही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. परिणामी गुंतवणूकदार व प्रतिनिधी यांच्यात भांडण, हाणामारीचे प्रकार घडत आहेत. प्रतिनिधींना त्रास होणार नाही यासाठी शासनाने उपाय करण्याची मागणी निवेदनात केली आहे.पर्ल्स ग्रुप आॅफ कंपनी, साईप्रसाद ग्रुप आॅफ कंपनी, समृद्ध जीवन ग्रुप आॅफ कंपनी, मैत्रेय प्लॉटर्स अॅन्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. कंपनी, ट्विंकलग्रुफ आॅफ कंपनी, एच. बी. एन. डेअरीज ग्रुप आॅफ कंपनी, गरिम ग्रुप आॅफ कंपनी, एनआयसीएल कंपनी, सनशाईन ग्रुप आॅफ कंपनी, पॅन कार्ड क्लब लि. या कंपन्यांमधील गुंतवणूकदारांनी हा मोर्चा काढला.
बीडमध्ये फसलेल्या गुंतवणूकदारांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:43 IST