माजलगाव : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा एका प्राध्यापकाचे घर फोडून ६६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना तालुक्यातील चिंचगव्हाण येथे बुधवारी घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील सोळंके महाविद्यालयातील प्राध्यापक लक्ष्मण संतराम गिरी हे चिंचगव्हाण येथे कुटुंबासह राहतात. बुधवारी साडेदहा वाजता ते पत्नी, मुलगी व मुलाला बाहेरगावी सोडण्यासाठी घराला कुलूप लावून माजलगाव बसस्थानकावर गेले होते. कुटुंबीयांना अंबड बसमध्ये रवाना केल्यानंतर ड्युटीसाठी ते महाविद्यालयात गेले. दुपारी साडेतीन वाजल्यानंतर ते चिंचगव्हाण येथील घरी आले असता, घराच्या मुख्य लोखंडी दरवाजाचे कुलूप तुटून दरवाजा उघडा असलेला त्यांना दिसला. यावेळी त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटाचा कोयंडा तोडून आतील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. त्याचबरोबर कपाटातील दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे पेंडंट, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची मोरणी, सोन्याची नथ, चांदीचे जोडवे ज्यांची अंदाजित किंमत २२ हजार ५०० रुपयांसह रोख २४ हजार रक्कम असा एकूण ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान, अज्ञात चोरट्यांविरोधात लक्ष्मण गिरी यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे करीत आहेत.
===Photopath===
170621\purusttam karva_img-20210617-wa0036_14.jpg~170621\purusttam karva_img-20210617-wa0035_14.jpg