घरीच वडाचे रोपटे आणून केली पूजा
शिरूर कासार : गुरुवारी वटसावित्री पौर्णिमा असल्याने सौभाग्यवती आपल्या कुंकवाच्या धन्याला आयुष्य वृद्धीची मागणी करत वडाची पूजा करत असतात. मात्र कोरोनाची दहशत अद्याप कमी न झाल्याने बहुतांश महिलांनी आपल्या घरीच वडाचे रोपटे आणून पूजा केल्याचे दिसून आले. कोरोनाच्या सावटातही काही महिलांनी रोपट्याऐवजी मोठ्या वडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली.
एसबीआयमध्ये पीककर्जासाठी झुंबड
शिरूर कासार : खरीप हंगामात पीककर्ज घेण्यासाठी येथील एसबीआयच्या शाखेत शेतकरी गर्दी करीत आहेत. तसेच कर्जाच्या नूतनीकरणासाठी रांगेत उभा असल्याचे चित्र दिसत होते. बँकेत मनुष्यबळाची कमतरता असल्याने शेतकरी ताटकळत उभा राहत असून, नंबर जाऊ नये यासाठी गर्दी होत असून, कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून आले.
घोंगडे, छत्र्या उघडल्या
शिरूर कासार : पावसाला सुरुवात होताच घोंगडे आणि छत्र्या उघडल्या गेल्या तर काही जण रेनकोट घालून आवश्यक कामासाठी बाहेर फिरत असल्याचे दिसून येत होते. शेतकरी मात्र पावसात भिजत त्यांची कामे करत असल्याचे चित्र दिसत होते.
नांदेवली गाव झाले कोरोनामुक्त
शिरूर कासार : तालुक्यातील नांदेवली गावात एक महिन्यापूर्वी कोरोनाने मोठा धुडगूस घातला होता. त्यात प्रसिद्ध कीर्तनकार तथा अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संपर्कप्रमुख अर्जुन महाराज यांचे निधन झाल्याने संपूर्ण गाव भयभित झाले होते. मात्र अथक प्रयत्नानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मागील २० दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण निघाला नसल्याने सध्यातरी आमची नांदेवली कोरोनामुक्त असल्याचे सरपंच ओमप्रकाश जोजारे यांनी सांगितले.