बीड : प्रसुतीसाठी माहेरी आलेली महिला शेकोटी करून उब घेत असताना अचानक साडीने पेट घेतला. यामध्ये ती गंभीररित्या भाजल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यानंतर तिची मागील पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
अश्विनी योगेश खडसे (२१ कवडगाव जि.अहमदनगर) असे मयत गर्भवतीचे नाव आहे. आश्विनी यांचे बार्शी (जि.उस्मानाबाद) माहेर आहे. प्रसुतीसाठी त्या काही दिवसांपूर्वीच बार्शी येथे आल्या होत्या. सध्या थंडीचे दिवस असल्याने त्या शेकोटी करून तापत होत्या. याचवेळी अचानक साडीने पेट घेतला. यामध्ये त्या गंभीररित्या भाजल्या. त्यांना तात्काळ बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.