बीड : सुमारे ४० लाख २४ हजार ५८० रुपयांच्या मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी बीड नगरपालिकेच्या वसुली पथकाने शहरातील इदगा रोड येथील वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंता कार्यालयाच्या स्टोअर रूमला सील करून जप्तीची कारवाई केली. या कारवाईआधी सकाळी १० वाजता वीज वितरण कंपनीने नगरपालिकेकडील २२ ते २३ कोटी रुपये थकबाकीपोटी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा वीजपुरवठा खंडित केला होता. वीज वितरण कंपनीकडे ४० लाख २४ हजार ५८० रुपयांची थकबाकी असल्याने नगर परिषद अधिनियम १८६५ अन्वये कलम १५० व कलम १५२ नुसार इदगा रोड येथील सहायक अभियंता कार्यालयाच्या स्टोअर रूमला जप्त करून सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. जप्ती अधिकारी सय्यद सलीम सय्यद याकूब, कर अधीक्षक एन.एम. पठाण, कर निरीक्षक अनिल जाधव, दत्तात्रय व्यवहारे, प्रशांत स्वामी यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी ३ वाजता ही कारवाई केली. यावेळी गोरख गायकवाड, भय्या जोगदंड, नीलेश गायकवाड, अरुण काळे हे पंच म्हणून उपस्थित होते. गुरुवारी सकाळी १० वाजता बीड नगरपालिकेकडे दहा वर्षांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कंपनीने कारवाई केली होती. विशेष म्हणजे यात मुदतही न देता तात्काळ वसुलीची मागणी करण्यात आल्याचे न.प. कर्मचाऱ्यांनी सांगितले. बीड शहराला पुरवठा व्यवस्थेची विद्युत जोडणी तोडली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने नवा प्रश्न उद्भवणार आहे.
कोरोनाकाळात तसेच या कालावधीतील परिणामांमुळे नगरपालिकेची करवसुली ठप्प झाली आहेच मालमत्ताधारकांकडून वसुलीसाठी सक्ती केलेली नाही, तसेच नगरपालिकेकडे थकबाकी असल्याने मार्चपासून शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई विद्युत वितरण कंपनीने केलेली आहे. विशेष म्हणजे पथदिवे बंदचा प्रश्न मागील काही वर्षांपासून नेहमी चर्चेत असतो. नगरपालिकेने सर्व पथदिव्यांना मीटर लावण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप मीटरप्रमाणे वीज बिल येत नसल्याने व अनावश्यक बिल दिले जात असल्याने नगरपालिकेने या रकमेचा भरणा थांबवलेला आहे.