रिॲलिटी चेक
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील आणखी एक ढिसाळ कारभार सोमवारी सकाळी समोर आला. कोरोनामुक्त झाल्यानंतर कोणाला काही लक्षणे जाणवल्यास ओपीडी तयार करण्यात आली. परंतु येथील डॉक्टर कुलूप लावून बिनधास्त गायब होत असल्याचे समोर आले आहे. तसेच आतापर्यंत तपासलेल्या रुग्णांची संख्याही अपडेट नसल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ६०९ इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, यापैकी १६ हजार ७९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ५५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर ३ टक्केपेक्षा जास्त आहे. कोरोनामुक्तीचा दरही ९५ टक्केपेक्षा जास्त असला तरी काहींना घरी गेल्यावरही विविध लक्षणे जाणवत आहेत. हाच धागा पकडून जिल्हा रुग्णालयात ओपीडी उघडली. तेथे तीन बीएएमएसचे डॉ. शाम जोशी, डॉ. शीतल क्षीरसागर, डॉ. पद्मश्री जोशी असे तीन डॉक्टर बसविले. परंतु हे डॉक्टर ओपीडीच्या वेळेतही ओपीडीला कुलूप लावून गायब होत असल्याचे दिसत आहे. अगोदरच ही ओपीडी उघडल्याची माहिती नाही आणि ज्यांना माहिती आहे ते रुग्ण गेल्यावर येथे कुलूप दिसत आहे. याचा फटका सामान्य रुग्णांना सहन करावा लागत आहे.
दरम्यान, ही ओपीडी केवळ सकाळीच ९ ते १२.३० या वेळेत सुरू असते. दुपारनंतर ती बंद असते. परंतु आहे त्या वेळेतही येथे डॉक्टर हजर राहात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
सीएसने घेतली गंभीर दखल
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना कुलूपबंद ओपीडीची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी तत्काळ या ठिकाणी वर्ग १चा अधिकारी प्रमुख म्हणून नियुक्त करण्याच्या सूचना केल्या. तसेच ओपीडीतील रुग्णसंख्या आणि कोणत्या आजाराचे किती रुग्ण, याची माहितीही मागविली. आता त्यांच्याकडूनही गायब झालेल्या डॉक्टरांवर कारवाई केली जाते की नाही, हे वेळच ठरवेल.
एसीएसचे दुर्लक्ष, नियोजनही ढिसाळ
या ओपीडीचे नियोजन हे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी करणे गरजेचे आहे. परंतु त्यांचे कायम दुर्लक्ष होत असल्याने कामचुकारांची संख्या वाढली आहे. केवळ ढिसाळ नियोजनामुळे सामान्य रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
एमबीबीएस ऐवजी बीएएमएस डॉक्टर
कोरोनाबाधित असताना एमबीबीएस डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. परंतु कोरोनामुक्त झाल्यावरही अनेकांना गंभीर त्रास जाणवत आहे. त्यांच्या तपासणीची जबाबदारी बीएएमएस डॉक्टरांवर सोपविली आहे. वास्तवितक पाहता ही ओपीडी फिवर क्लिनिकला संलग्न असायला हवी. परंतु ती अडचणीच्या ठिकाणी असल्याने त्याबद्दल सामान्य नागरिक जागरूक नाहीत.
कोट
पोस्ट कोविड ओपीडीमधील डॉक्टरांना बोलावून घेतले असता, त्यांनी चावी सापडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते परिसरात कुठेतरी होते. आतापर्यंत किती रुग्ण तपासले, याची माहिती काढायला सांगितली आहे.
डॉ. सुखदेव राठोड
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड