परळी : तालुक्यातील दाऊतपूर येथील राख बंधाऱ्यात रविवारी दुपारी राखेच्या ढिगाऱ्यावर अडकलेली पोकलेन मशीन क्रेनच्या साहाय्याने खाली घेत असताना वजन नियंत्रित न झाल्याने क्रेनसह पोकलेन मशीन जमिनीवर अचानक खाली आदळली. त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणासही इजा झाली नाही.
दोन दिवसांपूर्वीच पांगरी येथे राख वाहनचालकांना महिलेने चप्पलचा चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा प्रकार ताजा असताना रविवारी क्रेन व पोकलेन मशीन उंचावरून खाली आदळल्याचा व्हिडिओ वायरल झाला. हा प्रकार परळीजवळील राख बंधारा परिसरातील असल्याचे सांगण्यात येते.
परळी तालुक्यातील दाऊतपूर येथील राख तळ्यात दररोज २०० हायवा गाडी भरून राख घेऊन जात आहेत. ही राख ढिगाऱ्यातून हायवामध्ये टाकण्यासाठी पोकलेन मशीनचा वापर केला जातो. या परिसरात पन्नासपेक्षा अधिक पोकलेन आहेत. त्यापैकी एक पोकलेन राखेच्या ढिगावर अडकली. ही पोकलेन मशीन खाली घेण्यासाठी क्रेन आणली. या क्रेनच्या साहाय्याने पोकलेन मशीन खाली काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, वजन सहन न झाल्याने पोकलेन व क्रेन दोन्ही जमिनीवर आदळल्या. यात नुकसान झाले नाही; परंतु या परिसरात असणारे कामगार हादरून गेले. राख तळ्याकडे कोणाचेच नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे. राख वाहतूक सर्रास सुरू असून शहर व परिसरात प्रदूषण वाढले आहे. त्यातच अपघाताच्या घटनाही घडत आहेत.