जीर्ण तारा, खांबामुळे धोका
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात व शहरात जुन्या वसाहतीत अनेक ठिकाणी विद्युत खांब व विद्युत तारा जीर्ण झालेल्या आहेत तर, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रोवण्यात आलेले पोल वाकडे झाल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी विद्युत खांबांमधील अंतर जास्त असल्याने तारा लोंबकळत आहेत. अशा ठिकाणी नवीन विद्युत खांब लावण्यात यावेत व शहरातील जीर्ण झालेल्या तारा व पोल बदलण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.
केजमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य
केज : शहरात नगरपंचायतीच्या वतीने सफाई कामगार शहरातील घनकचरा वेळेवर उचलत नाहीत. त्यामुळे शहरातील मंगळवार पेठ, मेन रोड, नाईकवाडे गल्ली, शनिमंदिर रस्ता, कानडी रोड, वकील वाडी भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील घनकचरा उचलण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
नाल्यातील पाणी रस्त्यावर
केज : शहरातील नाल्याची साफसफाई नगरपंचायतीने पावसाळा पूर्व केली नाही. पाऊस पडल्याने नाल्यात घाण साचल्याने पाणी शहरातील प्रमुख रस्त्यावर येत आहे. नाल्यातील घाण पाणी अनेकांच्या घरात जात आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे तरी नगरपंचायतीने शहरातील नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.