अंबाजोगाई : शहरासह तालुक्यातील कृषी दुकानांमध्ये शिल्लक असलेल्या बी-बियाणे व खताचे दरपत्रक दुकानाच्या दर्शनी भागात लावावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे.
खरीप हंगामातील पेरणी योग्य पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाने देखील सरासरी इतका पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतकरी पैशाची जुळवाजुळव करून बी-बियाणे व खत खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. याचा फायदा काही विक्रेते घेत असून, वाटेल त्या दरात खते व बियाणे विकत आहेत. याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनेही देण्यात आली. परंतु संबंधित विभागाच्या वतीने कसलीच हालचाल केलेली दिसत नाही. गंभीर बाब म्हणजे बियाणे शिल्लक असताना देखील बियाणांचा तुटवडा असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. यासाठी दुकानाच्या दर्शनी भागात बियाणे दरपत्रक व बियाणे शिल्लक असलेला तपशील लावण्याबाबत दुकानदारांना आदेश द्यावेत, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनी दिला आहे.