केज (जि. बीड) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल २०५ दिवस उलटले असले तरी, या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याच्यापासून आमच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, अशी भीती व्यक्त करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिस प्रशासनाला इशारा दिला. जर कृष्णा आंधळेला तत्काळ अटक झाली नाही, तर ते लवकरच कठोर भूमिका घेऊ, असे त्यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले.
धनंजय देशमुख म्हणाले, आरोपींचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी न्यायालयातील सुनावणीच्या दिवशी पक्षचिन्हांच्या गाड्या घेऊन मोठ्या संख्येने येतात. ते न्यायालयाबाहेर भयभीत करणारे वातावरण निर्माण करून देशमुख कुटुंबीयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय या प्रकरणातील सर्व आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात पाठवण्यात यावे, अशी मागणी केली. परंतु, ही मागणीदेखील दुर्लक्षित केली जात आहे. सर्व आरोपींना एकाच तुरुंगात ठेवल्याने ते कटकारस्थान करत असल्याचा संशय धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.
न्यायासाठी कठोर भूमिका घेणारजर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि आरोपीला अटक झाली नाही, तर मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला. आता पोलिस प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे लक्ष लागले आहे.