- संजय खाकरेपरळी ( बीड) : हर हर महादेव , ओम नमः शिवाय चा जयघोष करत बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी देशातील बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे महाशिवरात्रीच्या दिवशी बिल्व पत्र वाहून दर्शन घेतले आहे . तसेच धर्मदर्शन रांगेत उभे टाकून दर्शन घेणाऱ्या भाविकांची वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्या पर्यंत रीघ लागली आहे. दर्शनासाठी भाविकांच्या महिला, पुरुष व पासधारक अशा तीन रांगा लावण्यात आल्या आहेत. महाशिवरात्रीचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. तर आज सकाळी सहानंतर या गर्दीत मोठी वाढ झाली आहे.
श्री वैद्यनाथ मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने फुलला आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरातील प्रति वैद्यनाथ मंदिर , पंचमुखी महादेव मंदिर,संत जगमित्र नागा मंदिर, श्री गणपती मंदिर, सूर्येश्वर मंदिर, जिरेवाडीतील श्री सोमेश्वर मंदिर, तसेच धर्मापुरी, लाडझरी येथील महादेव मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हजारो शिवभक्त दाखल झाले आहेत. रांगेत थांबून भाविक दर्शन घेऊ लागले आहेत. श्री वैद्यनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेट उभारण्यात आले असून त्यावर कापडी मंडप टाकण्यात आला आहे त्यामुळे उन्हा पासून रांगेत थांबलेल्या भाविकांचा बचाव होत आहे.
वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 200 च्या वर पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहे तसेच येणाऱ्या भाविकांना वैद्यनाथ मंदिर रोडवर विविध संस्थेच्या वतीने खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे :महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त प्रजापिता 'ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय' द्वारा संत जगमित्र नागा मंदिर परिसरात 26 फेब्रुवारी रोजी सकाळी ६ते रात्रौ ९ या वेळेत 'शिवलिंग अमरनाथजी बाबा बर्फानी दर्शन'!!ची सुविधा करून देण्यात येत आहे येथे ही भाविकांची गर्दी होत आहे.