निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खरीप हंगामासाठी पात्रुड सेवा सहकारी सोसायटीचे सचिव यांच्यामार्फत मुदतीपूर्वी ७० ते ८० शेतकऱ्यांचे खरीप पीक कर्ज मागणीच्या प्रस्ताव दाखल केले होते. या प्रस्तावास मंजुरी मिळण्यासाठी चेअरमन या नात्याने मी व सचिव यानी वारंवार शाखा माजलगाव व मुख्य कार्यालय बीड येथे पाठपुरावा केला होता. परंतु, बँक प्रशासनाकडून अद्यापही याची दखल न घेता चालढकल केली आहे. या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज प्रकरणास संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांची इच्छा असतानाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा हे जाणीवपूर्वक अडवणूक करीत आहेत. या त्यांच्या हुकूमशाही व अडवणुकीविरोधात येत्या दोन दिवसांत कर्ज प्रकरणे नियमानुसार मंजूर न केल्यास जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर आत्महदन करण्याचा इशारा पात्रुड सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सूर्यकांत मारोतराव धुमाळ यांनी दिला आहे.
कर्ज अन् बेबाकी प्रमाणपत्र रोखले
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पात्रुड सोसायटीअंतर्गत खरीप पीक कर्ज दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक झाली. या शेतकऱ्यांना एक तर जिल्हा बँकेने कर्ज दिले नाही. परिणामी, शेतकऱ्यांनी इतर बँकेतून कर्ज घेण्याचे प्रयत्न केले. त्यावर इतर बँकांना नोड्यूजची मागणी केली. यावर जिल्हा बँकेने नोड्यूजसाठी अडवणूक करीत इतर पीक कर्जापासून वंचित ठेवले.
उद्दिष्टाच्या १७५ टक्के कर्ज वाटप
खरीप हंगामाची कर्जवाटप प्रक्रिया ३० सप्टेंबर २० रोजीच संपली. उद्दिष्टाच्या १७५ टक्के कर्ज वाटप करून जास्तीत जास्त सदस्यांना लाभ होईल, हे बघितले. आता रबीसाठी कर्ज वाटप चालू असून उद्दिष्टाच्या ८० टक्के वाटप झाले असून प्रक्रिया चालू आहे. कुणा सदस्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी रितसर अर्ज दाखल करावेत. नियमानुसार सर्वांना रबीसाठी कर्ज दिले जाईल. यासाठी उपोषण, आंदोलन करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रया जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी ‘लोकमत’ला दिली.