प्रशासनाकडून आवाहन : अन्न व्यावसायिक व हॉटेल चालकांना आवाहन
बीड : कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळे या वर्षीचा महाशिवरात्री व इतर सणांसाठी पार्श्वभूमीवर नागरिक व अन्न व्यावसायिक तसेच हॉटेल चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, (अन्न) अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
येत्या ११ मार्च रोजी महाशिवरात्र आहे. त्या अनुषंगाने अनेकांना उपवास असतो. त्यामुळे नागरिकांनी भगर, शाबुदाणा, खाद्यतेल विकत घेताना ते पॅकबंद विकत घ्यावे. भगर, शाबुदाणा, खाद्यतेल विकत घेतलेल्या अन्नपदार्थांवर कुठल्याही अन्नपदार्थाचा नाव ब्रॅन्ड नसल्यास दुकादारास ब्रॅन्डबद्दल विचारणा करावी. उत्पादनाची शेवटची तारीख पाहून ते खरेदी करावे, भगरीचे पीठ बाजारातून विकत घेऊ नये. भगर विकत घेतल्यानंतर ती स्वच्छ धुऊन त्यानंतरच घरगुती पद्धतीने पीठ तयार करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
हॉटेलचालकांनी शारीरिक अंतर राखावे, मास्क वापरणे आवश्यक आहे. तसेच वारंवार हाताची स्वच्छ करणे या बाबींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. हॉटेलचे किचन तसेच अन्नपदार्थ सेवन करण्यासाठीची जागा, त्या ठिकाणची भिंत व फरशी स्वच्छ असावी. कच्च्या अन्नपदार्थांचा खरेदी बिल तपशील व्यवस्थित असावा, तसेच साठा रजिस्टरमध्ये त्यांची नोंद असावी. अन्नपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींना गणवेश, टोप्या, मास्क, ग्लोज इत्यादी स्वच्छतेच्या बाबी पुरविण्यात याव्यात. हॉटेलमधील सर्व कामगार तसेच अन्नपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. हॉटेलमध्ये हात धुण्यासाठी वॉशबेसिन व्यवस्था व त्या ठिकाणी साबण सॅनिटायझर ठेवावे. ताज्या अन्नामध्ये शिळे अन्न मिसळू नये तसेच शिळे अन्नपदार्थ, वास येणारे अन्न पदार्थ हे कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला पुन्हा शिजवून देऊ नये, असे आदेश सहायक आयुक्त इम्रान हाशमी (अन्न आणि औषध प्रशासन विभाग, बीड) यांनी दिले आहेत.