NCP Supriya Sule: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मागील दोन महिन्यांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. तर दुसरीकडे, परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपीही अनेक महिन्यांपासून मोकाट असल्याचं समोर आल्यानंतर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. या दोन्ही घटनांवरून विरोधकांसह महायुतीतील काही नेत्यांकडून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं जात आहे. अशातच आज राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे विधीमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड हे बीड दौऱ्यावर जाणार असून हे दोन्ही नेते मस्साजोग इथं मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असून नंतर परळीतील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनाही भेटणार आहेत.
परळीतील बँक कॉलनी परिसरातराहणारे पिग्मी एजंट महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खुनाच्या घटनेस १६ महिने होत आले तरी अद्याप या प्रकरणातील आरोपींचा शोध लागला नाही. याच्या तपासासाठी विशेष पथक नियुक्त केले असून, चौकशी सुरू आहे. महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात २२ ऑक्टोबर २०२३ रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास परळी शहर पोलिसांना करता आला नाही. त्यानंतर आ. सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपींना घटनेच्या पंधरा महिन्यानंतरही अटक केली नसल्याची पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली. मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. त्यामुळे याच्या तपासासाठी अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्यासह पथक नियुक्त केले.
कसा असणार सुप्रिया सुळेंचा दौरा?मंगळवारी सकाळी ९ वाजता मस्साजोगचे देशमुख कुटुंबाची भेट घेतील. त्यानंतर परळी येथील महादेव मुंडे यांच्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी खा. सुप्रिया सुळे जाणार आहेत. त्यांच्यासमवेत खा. बजरंग सोनवणे, बीडचे आ. संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड हे असतील, असे देवराव लुगडे यांनी सांगितले.