Amol Mitkari on Suresh Dhas: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरेश धस यांच्या आक्रमक भूमिकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जशास तसे उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं आहे. वाल्मीक कराडच्या माध्यमातून धस यांनी धनंजय मुंडेंना लक्ष केलं होतं. त्यानंतर आता आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्याबाबत खळबळजनक दावे केले आहेत. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येआधी दोन दिवस सुरेश धस हे वाल्मीक कराडचा संपर्कात होते असा खळबळजनक आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमीन बळकावणे यासारखे आरोप असून त्यांची यादी मोठी असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं. धस यांच्याशी संबंधित प्रकरणातील पुरावे योग्य वेळी बाहेर काढण्याचा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. स्वतः अजित पवार यांनी सांगितले आहे की, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्न येत नाही. संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली त्याचे कोणीही समर्थन करत नाही. धनंजय मुंडे यांनी याबाबत पत्र काढून स्वतः भूमिका स्पष्ट केली होती. जो कोणी आरोपी असेल त्याला शासन झालं पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. जाणीवपूर्वक लक्ष वळवण्यासाठी विविध मोर्चांमध्ये आरोप केले जात आहेत. धनंजय मुंडे यांना राजकीय द्वेषापोटी टार्गेट करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे," असं अमोल मिटकरी म्हणाले.
"सुरेश धस ऐकायला तयार नसतील तर त्यांच्याबद्दलही बोलण्यासाठी खूप आहे. वाल्मीक कराड आणि सुरेश धस यांच्यात हत्या होण्याआधी दोन दिवसांपूर्वीच संभाषण झालं आहे. त्यांच्या संभाषणाचा ऑडिओ पोलिसांकडे गेल्याची माहिती आमच्याकडे आहे. घटनेच्या दोन दिवस आधीपर्यंत सुरेश धस हे वाल्मीक कराड यांच्या थेट संपर्कात होते. त्यामुळे सुरेश धस यांचीही चौकशी झाली पाहिजे की सगळ्यांची मागणी आहे," असंही अमोल मिटकरी म्हणाले.
"परळी तालुक्यात २००१ साली जो दरोडा टाकण्यात आला त्यात १७ दरोडेखोरांच्या अंगावर सुरेश धस मित्र मंडळ असं लिहिलेले टी-शर्ट होते. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे कोणी कशाप्रकारे हुकूमत तयार केली. आपण फारच सोज्वळ आहोत असा आव आणण्याची गरज नाही. आपला इतिहास फार चांगल्या पद्धतीने सगळ्यांना माहिती आहे," असं देखील अमोल मिटकरी म्हणाले.