बीड : केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीमुळे महिलांचे किचन बजेट कोलमडले असून दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
गेल्या काही दिवसांत गॅसचे दर सतत वाढत आहेत. केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणामुळे ही परिस्थिती ओढवली असून गॅस दरवाढीच्या भडक्याने सामान्यांना झळ पोहोचत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांनी केला आहे. अवाजवी गॅस दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या प्रदेश संघटक मीनक्षी देवकते, जिल्हा सचिव राणी शेख, शहराध्यक्षा माधुरी घुमरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.