पाटोदा तालुक्यातील मुगगावचे ग्रामस्थ धास्तावले : अहवालाकडे सर्वांचे लक्ष, डॉक्टरांचे दुर्लक्ष
अनिल गायकवाड
कुसळंब (ता. पाटोदा, जि. बीड) : मागील पाच दिवसांपासून पाटोदा तालुक्यातील आठेगाव पुट्यातील मुगगाव परिसरात कावळ्यांच्या अचानक मृत्यूमुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. ५ ते १० जानेवारीदरम्यान तब्बल ३२ कावळे मृत आढळले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी भेटी देऊन मृत कावळ्यांचे नमुने पुणे येथे पाठविले आहेत, तेथून हे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविले जाणार असून, ग्रामस्थांना अहवालाची प्रतीक्षा आहे.
५ जानेवारी रोजी मुगगाव येथे अचानक तब्बल १५ कावळे रस्त्यावर मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सहा तारखेला परत गावकऱ्यांना १० कावळे मृतावस्थेत दिसून आले. ही बाब समजताच पशुसंवर्धन विभागाचे डॉ. देशमुख व त्यांचे सहकारी गावात पोहोचले. त्यांनी सविस्तर माहिती घेत पाहणी केली. काही मृत कावळे पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यांनतर शनिवारी तीन कावळे मृत आढळून आले, तर चार कावळे घायाळ अवस्थेत आढळले. मात्र, त्यांच्यावर डॉक्टर उपचार करायला पुढे येत नसल्याचे गावकरी सांगतात. ग्रामस्थांमधील भीती लवकरात लवकर दूर करण्याची मागणी होत आहे.
कावळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले
दररोजच कावळे मरून पडण्याचे प्रमाण वाढत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीती वाढत आहे. पाच दिवसांत झालेला तब्बल ३२ कावळ्यांचा मृत्यू ग्रामस्थांना सतावत आहे. सरकारी यंत्रणेकडून गावकऱ्यांची भीती दूर करण्यासाठी उपाय आणि नेमके मार्गदर्शनही केले जात नसल्याचे दिसून येत आहे.
अनास्थेबद्दल नाराजी
कावळ्यांच्या मृत्यूनंतर बीड येथील डॉ. देशमुख आणि सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली; परंतु त्यानंतर या कावळ्यांच्या संदर्भामध्ये निश्चित उपचार करण्यासाठी मात्र संबंधित खात्याचा कोणताही डॉक्टर धजावत नसल्याचे दिसून येत आहे. याबद्दल पक्षीमित्र दीपक थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अहवालानंतरच वास्तव कळेल
मुगगाव येथील कावळे मृत्यू प्रकरणाचा तपासणी अहवाल पुणे आणि त्यानंतर भोपाळ येथे तयार झाल्यानंतर तो पशुसंवर्धन खात्याच्या हाती येईल आणि त्यानंतर या मृत्यू प्रकरणाच्या संदर्भामध्ये निश्चित आणि वास्तवता लक्षात येईल. त्यानुसार पुढील उपाय केले जातील.
-संदीप गायकवाड, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, आष्टी- पाटोदा