अंबाजोगाई : कुऱ्हाडीने गळ्यावर वार करून विवाहितेचा खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे उघडकीस आली आहे. सासऱ्यानेच सुनेचा खून केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शीतल अजय लव्हारे (वय २५) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तिचा सासरा बालासाहेब संभाजी लव्हारे याने कुऱ्हाडीने तिच्यावर गळ्यावर वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. तर, शीतलची सासू देखील या घटनेत जखमी झाल्याचे समजते. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित सासरा फरार झाला असून बर्दापूर पोलिसांचे पथक रात्रीपासून त्याचा कसून शोध घेत आहेत. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. प्रेमविवाह केल्याच राग ?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बालासाहेबचा मुलगा अजय लव्हारे याने पाच वर्षापूर्वी शीतलसोबत प्रेमविवाह केला होता. त्यांना चार वर्षाची एक मुलगी देखील आहे. आपला विरोध झुगारून अजयने विवाह केल्याचा राग बालासाहेबला होता. याच रागातून त्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. लग्नापासून अजय बाहेरगावी राहत होता. लॉकडाऊन नंतर तो गावाकडे परतला होता. अजयला पत्नीसह त्याच्या आईने घरात घेतल्याचा रागही बालासाहेबला होता अशी प्राथमिक माहिती आहे. पोलीस तपासानंतरच खरे कारण उघड होऊ शकणार आहे.
अंबाजोगाईत कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 14:10 IST
सासऱ्यानेच सुनेचा खून केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अंबाजोगाईत कुऱ्हाडीने वार करून विवाहितेचा खून
ठळक मुद्देतालुक्यातील पट्टीवडगाव येथील घटना