- मधुकर सिरसट केज ( बीड ) : 23 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील कासारी येथील मुलीचा विवाह असल्यामुळे तिच्या पित्यासह नातेवाईक जीपने अहिल्यानगर येथे कपड्याचा बस्ता बांधण्यासाठी सकाळी रवाना झाले होते. सांगवी सारणी पुलावरील वळणावर समोरून येणाऱ्या मालट्रकची जीपसोबत धडक होऊन झालेल्या अपघातात वधू पित्यासह लग्न जुळविण्यात मध्यस्थी असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अहमदनगर - अहमदपूर राष्ट्रीय महामार्गांवर सारणी शिवारात झाला.
केज तालुक्यातील कासारी येथील रामेश्वर शाहूराव डोईफोडे यांच्या मुलीचा विवाह बोरदेवी ता. बीड येथील इंजिनियर मुलासोबत 23 फेब्रुवारी आहे. दोन्ही बाजूच्या नातेवाईकांना सोयीचे म्हणून अहिल्यानगर येथे बस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता एका जीपमधून (एम एच 16 ए टी 0016) मुलीचे वडील, नवरी मुलगी व इतर नातेवाईक अहिल्यानगरकडे निघाले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास अहमदपूर -अहमदनर राष्ट्रीय महामार्गवरील सारणी - सांगवी पुलावरील वळणावर समोरून येणाऱ्या टेम्पो ( क्रमांक एम एच 01 / यु सी 5502) आणि जीपची जोरदार धडक झाली. यात वधू पिता रामेश्वर शाहूराव डोईफोडे ( 50 वर्षे, रा कासारी) आणि उर्मिला उर्फ उमा श्रीराम घुले ( 45 वर्षे, रा कोरेगाव ह मू शिक्षक कॉलनी केज) या दोघांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील, जमादार दत्तात्रय बिक्कड, शिवाजी कागदे, प्रकाश मुंडे, चालक दराडे यांनी अपघातस्थळी भेट दिली. मृत व जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.