लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मराठा आरक्षणाबाबत सरकारने विनंती याचिका सादर केली आहे. या याचिकेत संपूर्ण माहिती द्यावी, वकील चांगले लावावेत, अशी मागणी करून आरक्षणासाठी २८ जूनरोजी बीडमध्ये मोर्चा काढण्याची घोषणा भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली.
आ. सुरेश धस यांनी २४ जूनरोजी बीड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आरक्षण, ऊसतोड कामगार कायदा, कंत्राटी आरोग्य कर्मचारी भरती, भूसंपादन पीक विमा आणि पीक कर्ज वाटप आदी विविध मुद्द्यांवर माहिती दिली. धस म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चा निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. पीक कर्ज तातडीने वाटप व्हावे, पीकविम्याचा बीड पॅटर्न उलटा असल्याचा आरोप करून केवळ १३ कोटी ७५ लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले, असे सुरेश धस म्हणाले. उसतोड मजूर, मुकादम यांच्यासाठी कायदा करावा, ऊसतोड मजुरीत ८० टक्के वाढीची मागणी हेाती, पूर्वी १४ टक्के मिळाली असून, आता ६६ टक्के वाढ मिळावी, अशी मागणीदेखील यावेळी धस यांनी केली.
कोविडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी पात्र कर्मचाऱ्यांना आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या भरतीत सामावून घ्यावे. आरोग्य विभागाच्या भरतीत नवे लोक घेण्यामध्ये काही तरी गौडबंगाल आहे, यात आरोग्य मंत्र्यांचा हेतू दूषित असल्याचा आरोपही त्यांनी केला.
...
आठ तालुक्यांत वाळू घाट सुरू करा
तीन तालुक्यांत वाळूघाट सुरू असून, उर्वरित आठ तालुक्यांत वाळूघाट सुरू करावेत, पंतप्रधान व रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थींना पाच ब्रास वाळू द्यावी, कोविड बळींच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, रेल्वे, रस्ते, तलावांसाठी संपादित जमिनींचा मावेजा द्यावा, युरियाचा बफर स्टॉक वाढवावा, प्रत्येक दुकानदारांना युरिया उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना दिले आहे.
===Photopath===
240621\24_2_bed_20_24062021_14.jpg
===Caption===
आमदार सुरेश धस