बीड जिल्हा गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीवरुन राज्यभर चर्चेत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली. तर दुसरीकडे सतीश भोसले याने केलेल्या मारहणीचे व्हिडीओ व्हायरल झाले. सतीश भोसले याला पोलिसांनी आता ताब्यात घेतले आहे. भोसले याचे भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासोबत फोटो व्हायरल झाले. दरम्यान, काही दिवसापूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आता क्षीरसागर यांनी बीड नगर परिषदेतील लेखापाल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी बीड नगरपरिषदेतील लेखापाल गणेश पगारे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गणेश तुळशीराम पगारे हे बीड नगरपरिषदेतील लेखापाल पदावर कार्यरत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. तसेच त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार दिली. पगारे यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.
“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ
संदीप क्षीरसागर यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवरुन पगारे यांना धमकी देणारा फोन कॉल आला होता, असे आरोपात म्हटले आहे. क्षीरसागर यांच्याविरोधात कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे.
फिर्यादीमध्ये काय आहे?
गणेश तुळशीराम पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी पगारे गणेश तुळशिराम (वय ५७) व्यवसाय नोकरी, रा.स्नेहनगर बीड येथील रहिवाशी असून जातीने अनुसूचित जाती पैकी महार आहे. मी बीड नगर परिषदेमध्ये लेखापाल पदावर कार्यकरत आहे. आज 12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.14 वाजता तीन मिसकॉल मा. आमदार साहेबांचे आले, पण माझा फोन सायलेंट मोडवर होता.
यानंतर आमच्या घरी चौरे नामक आमदार क्षीरसागर यांचे स्वीय सहायक आलेले होते व त्यांचे सोबत दूसरे कोण होते त्यांना मी ओळखत नाही. मग मी चौरे नां विचारले काय झाले तर ते म्हणाले आमदार साहेब बोलणार आहेत. मी म्हणालो मी माझ्या फोनवरुन बोलतो तर ते म्हणाले नाही माझ्या फोनवरच बोला. यावेळी मी फोन घेतला तर पुढून आमदार साहेब मला म्हणाले की, कारे नुसता गोड गोड बोलतो असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. तसेच, आता मी बीडला आल्यावर लवकर माझ्याकडे यायचं असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी माझ्यावर वार करण्याची भाषा केली, असंही त्यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे.