बीड : मासिक पाळीतील स्वच्छतेअभावी होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील डॉ. माधुरी रायमाने यांनी केले. येथील माऊली विद्यापीठ संचलित, महिला कला महाविद्यालयात गृहविज्ञान विभाग, समाजशास्त्र विभाग, महिला विकास कक्ष आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेच्या वतीने जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त राज्यस्तरीय वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सविता शेटे या होत्या.
सुरुवातीला प्राचार्य डॉ. शेटे यांनी युनिसेफच्या सर्वेक्षणानुसार ७० टक्के मुली मासिक पाळी सुरू असताना शाळेत जात नाहीत, तर ८४ टक्के मुलींच्या शाळेत मासिक पाळीत आवश्यक साधनांची सुविधा नसल्याची माहिती दिली. मासिक पाळीतील स्वच्छतेसाठी देखील कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर कशी गुंतवणूक झाली पाहिजे यावर मत मांडले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. माधुरी रायमाने यांनी ‘मासिक पाळी-स्वच्छता आणि आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. मासिक पाळीत स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी सविस्तर आणि सोदाहरण पटवून दिले. आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जंतुसंसर्ग टाळण्यासाठी सजग राहण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनानंतर उपस्थितांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या मनातील शंकाचे निरसन करून घेतले. सूत्रसंचालन करून पाहुण्यांचा परिचय गृहविज्ञान विभागाच्या डॉ. संध्या आयस्कर यांनी करून दिला. महिला विकास कक्षाच्या डॉ. अर्चना वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक, विद्यार्थी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांमधील व्यक्ती, गृहिणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.